कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
जन्म. १ फेब्रुवारी १९२९
`कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये झाला.
जयंत शिवराम साळगावकर हे त्यांचे पूर्ण नाव. साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून `कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयच्या खपाचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी आपल्यातील कल्पक उद्योजकाचे कौशल्य सिद्ध केले. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते. ते मुंबईतील प्रसिध्द श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी व आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणार्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. मुंबई मराठी साहित्य संघ व इतिहास संशोधन मंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते. १९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते.
तसेच मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाटय़संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. `सुंदरमठ, देवा तूचि गणेशु’ ही पुस्तके व धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथाचे संपादन व लेखन त्यांनी केले. * जयंत साळगावकर* यांचे २० ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले. * जयंत साळगावकर* यांना आदरांजली.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق