चित्रकार चारुहास पंडित
जन्म. २० ऑगस्ट पुणे येथे.
चारुहास पंडित यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग व अभिनव कला महाविद्यालय येथुन G. D. Art ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. G. D. Art करतानाच त्यांनी जपानी भाषेचा अभ्यास केला, व स्कॉलरशिप मिळून जपान दौरा केला. चारुहास पंडित यांचे कॉम्प्युटर ग्राफिक्स व कार्टून अनिमेशन मध्ये विशेष प्राविण्य आहे. ते खरे व्यंगचित्रकार नव्हेत G. D. Art करत असताना दिवाळी अंकामध्ये येणारी व्यंगचित्रे पाहून व्यंगचित्र कशी काढायाची ते शिकले. शि. द. फडणीस, बाळासाहेब ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मारिओ मिरांडा हे त्यांचे गुरु. चारुहास पंडित हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’ च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढत असत. चारुहास पंडित यांनी झाडांच्या सालींपासून कोणतेही रंग न वापरता विकसीत केलेला काष्ठशिल्प प्रकार हा नाविन्यजोगा आहे. काष्ठ चित्र या कलाप्रकारातील चित्र निर्मिती व त्या कलेतील चित्रांसाठी त्यांनी स्वतःची ‘सृजन आर्ट’ नावाची आर्ट गॅलरी ऊघडली आहे. चारुहास पंडित हे प्रसिद्ध झाले ते चिंटू मुळे.
प्रभाकर वाडेकर व चारुहास पंडित हे दोघे मित्र. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी दोघांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली. त्या वेळी त्यांची जोडी जमली आणि 'चिंटू'ची कल्पना साकार झाली. चारुहास पंडित हे गेली २२ वर्षे प्रभाकर वाडेकरांच्या साथीने आपली नियमितपणे दैनिक सकाळ वर्तमानपत्रातून ‘चिंटू’ सादर करत होते. २१ नोव्हेंबर १९९१ पासून सुरू झालेला ‘चिंटू’चा हा प्रवास २०१३ मध्ये प्रभाकर वाडेकर यांच्या अचानक निधनानंतर त्यांनी थांबवला होता. पण त्यानंतर सध्या परत त्यांनी चिंटूचा प्रवास चालू केला आहे. नियमित भेटणारा चिंटू अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. चिंटू वाचणे ही फक्त लहानग्यांची नाही, तर अनेक मोठ्यांचीही नेहमीची सवय होती.
मध्ये चार वर्ष हा चिंटू सकाळमधून लोकसत्तेत गेला होता. पुन्हा तो सकाळमध्ये प्रसिद्ध होऊ लागला. इंटरनेटवर चिंटूला www.chintoo.com या साइटवर भेटू शकता. तसेच चिंटूवर २०११ व २०१२ मध्ये यावर दोन सिनेमेही आला होता. आज चिंटूला फेसबुकवर सहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
चारुहास पंडित यांना मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार. तसेच ‘COSMOS’ पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’, ROTRACT CLUB चा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ असे अनेक पूरस्कार मिळाले आहेत. ते ‘कार्टूनिस्टस कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष राहीले आहेत.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق