*महाराष्ट्र घडविणारा महानायक : वसंतराव नाईक*
हरित क्रांतीचे प्रणेते,सलग बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक साहेब यांची आज जयंती. त्यानिमित्ताने वसंतराव नाईक साहेब यांची जडणघडण, राजकीय प्रवास , मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय , महाराष्ट्राच्या राजकारणातील वसंतरावांचा ठसा आधी गोष्टीबद्दल जाणून घेऊयात.
*वसंतरावांची जडणघडण*
यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या गहुली या गावात एका बंजारा कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी फुलसिंग नाईक व हुणकीमाता या शेतकरी कुटुंबात वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. अशा साधारण कुटुंबात जन्मलेले असताना आणि कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही खरे तर आश्चर्याची गोष्ट आहे. गहुली गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे तीन किलोमीटर दूर असणाऱ्या गावात पायी प्रवास करून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. नागपूर मधील निल सिटी हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा वसंतराव उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली अस्पृशता निवारण, स्त्री शिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा वसंतरावाच्या मनावर प्रचंड प्रभाव पडत गेला. नागपूर हे त्याकाळी राजकीय सामाजिक चळवळीचे केंद्र मानलं जायचं. नागपुरातील अशा वातावरणात त्यांची राजकीय सामाजिक जडणघडण झाली व एकविसाव्या वर्षी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पुढे एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली केली. आकर्षक व्यक्तिमत्व मनमिळावू स्वभाव गरीब गरजू माणसांना मदत करण्याची वृत्ती यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय वकील झाले.
*आंतरजातीय विवाह*
वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी वत्सलाबाई या ब्राह्मण समाजातील मुली बरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला. आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली त्याकाळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पद्धतीने विवाह करणे याला क्रांतीच म्हणावे लागेल. बंजारा समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा यात बदल घडवून आणण्यासाठी वसंतराव आणि पुढाकार घेतला.
*राजकीय प्रवास*
शेती आणि शेतकरी हे त्यांचे जिव्हाळ्याचे नव्हे तर अभ्यासाचे विषय होते. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वसंतरावांनी सपाटा लावला. जनमानसातील प्रसिद्धीमुळे १९५२ च्या विधानसभा निवडणुकीला वसंतराव पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. तसेच उपमंत्री झाले. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मंत्रिमंडळात त्यांना "महसूल मंत्री" हे महत्त्वाची खाते देण्यात आले. मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर १९६३ते १९७५ अशी सलग बारा वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. वसंतरावानंतरच्या कोणत्याच मुख्यमंत्र्याला हा रेकॉर्ड मोडता आला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सलग बारा वर्षे मुख्यमंत्री राहणं ही सोपी गोष्ट नाही. वसंतरावने ते करून दाखविले. वसंतरावासारखे सर्वसामान्यतून आकाराला आलेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्यामुळे राज्याचे भले झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळू शकलं परिणामी विकासाला योग्य आणि गतिमान दिशा मिळाली.
*मुख्यमंत्री असताना घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय...*
बारा वर्षे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा पदभार सांभाळणाऱ्या वसंतरावनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आता जसा पाणी अभावी दुष्काळ पडतो तसा त्याकाळी अन्नधान्याचा दुष्काळ होता. अन्नाअभावी लोकांची मृत्यू होण्याची प्रमाण तेव्हा भयंकर होते. तेव्हा लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते अन्नधान्याच्या समस्येवर, संकटावर मात करण्यासाठी त्यांनी
'जय जवान, जय किसान '
असा नारा दिला होता. भारतीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अमेरिकेकडून गहू आयात करण्यात आला होता.
अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू अमेरिकेतून येत होता.अशी अन्नधान्याची टंचाई पाहून ,
*"पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या."*
असं धाडसी विधान त्यांनी केलं आणि खरोखर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण करून दाखवला. शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे उपलब्ध करून दिले. कापूस एकाधिकार योजना राबवली. महाराष्ट्र दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी गुजरात वर अवलंबून होता. त्यावर मात करण्यासाठी वसंतरावांनी कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या मदतीने संकरित गायीची खरेदी केली आणि दुग्धउत्पादनासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यांच्या या प्रयत्नामुळे अल्पावधीतच महाराष्ट्रात "धवल क्रांती" घडून आली. शेतीला आधुनिक स्वरूप घेण्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठातील संशोधनामुळे महाराष्ट्राच्या कृषी विषयक ध्येयधोरणात वसंतरावांच्या काळात अमुलाग्र बदल घडवून आला. उजनी ,जायकवाडी, चासकमान, पेंच ,अप्पर वर्धा , धोम ही धरणे आणि पारस , खापरखेडा, कोराडी, भुसावळ ही औष्णिक विद्युत प्रकल्प वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नात उभी राहिली. विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वीज आणि पाणी या मूलभूत गरजांची त्यांनी सोय केली.
*"पाणी आडवा पाणी जिरवा"*
ही योजना त्यांच्याच काळातील. दुष्काळावर मात करण्यासाठी वि.स. पागे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली
*"रोजगार हमी योजना"*
वसंतरावांनी उचलून धरली. १९७२ च्या दुष्काळात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आली.पुढे केंद्राने देखील या योजनेची दखल घेऊन "महात्मा गांधी रोजगार हमी योजना" म्हणून ही योजना देशभरात राबवली. आज देखील ही योजना चालू आहे. १९६७ साली कोयना भूकंप झाल्यावर भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन देखील त्यांनी केले. मराठी भाषेला *"राजभाषेचा दर्जा"*
म्हणून देण्यात वसंतरावांचा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या *पंचायत राज समितीचे अध्यक्षपद* वसंतराव नाईक यांच्याकडे होते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.त्यांनी केलेल्या पंचायत राज विषयीच्या शिफारशीनुसारच आजच्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती व ग्रामपंचायत चा कारभार चालू आहे.
*महानायक वसंतराव*
कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांची जयंती *"कृषी दिन"* म्हणून साजरी केली जाते. वसंतरावाच्या कार्याची संघर्षमय, जीवनप्रवासची दखल घेणारा *"महानायक वसंत तू "* हा चित्रपट देखील २०१५ साली प्रदर्शित झाला आहे.
मित्रहो, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे मुख्यमंत्री या सामान्य नावापुरते वसंतरावंना मर्यादित ठेवून चालणार नाही. महाराष्ट्रासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या या नेत्याच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करून महाराष्ट्राला अधिक उंचावर नेले पाहिजे. वसंतरावांनी घडवलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते वसंतराव नाईक साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा