.
*अभिनेत्री सुधा चंद्रन
जन्म - २७ सप्टेंबर १९६५ (केरळ)
अभिनेत्री नि नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा जन्म केरळ राज्यातला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एका अपघाता मध्ये सुधा ह्यांना एक पाय गमवावा लागला. पण यामुळे खचून न जाता ‘जयपूर फुट’ लावून घेऊन त्यानंतरही त्यांची नृत्याराधना चालू ठेवली, आणि भारतातील प्रथितयश नृत्यांगना म्हणून लौकिक मिळविला. सुधा चंद्रन यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका मध्येही भूमिका केल्या आहेत. नृत्यकले करिता आणि अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरी निमित्त त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी आजवर अनेक चित्रपटा मध्ये नि मालिका मध्ये काम केले आहे. 'कही किसी रोज' या मालिकेत त्यांनी साकारलेली 'रमोला सिंकंद' ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्या एक चांगल्या अभिनेत्री असण्या सोबतच एक खूपच चांगल्या डान्सर आहेत. त्या गेल्या अनेक वर्षा पासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सुधा चंद्रन यांचे लग्न रवी डंग यांच्या सोबत झाले असून ते देखील बॉलिवूड मध्ये कार्यरत आहेत. ते गेली अनेक वर्षं असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. सुधा आणि रवी यांच्या प्रेमकथे विषयी सुधा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी एका चित्रपटात काम करत होते. त्या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर रवी होते. मी पहिल्याच भेटीत त्यांच्या प्रेमात पडले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी चित्रपटाच्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा गेले, त्यावेळी मी सगळ्यांना जाऊन भेटले, सगळ्यांना हाय हॅलो करताना मी त्यांच्याशी देखील बोलायला गेले. पण ते कामात व्यग्र असल्याने त्यांनी माझ्या हायला प्रतिसाद दिला नाही. त्यावर तुम्ही असे का वागलात? असे मी लगेचच त्यांना विचारले होते. त्यावर माझ्या प्रोटोकॉल मध्ये तुम्हाला विश करणे येत नाही असं म्हणत ते पुन्हा कामात बिझी झाले होते. मला त्यांची हीच गोष्ट प्रचंड आवडली. कामाप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेच्या मी प्रेमात पडले. त्यांना खरे तर जास्त बोलायला आवडतच नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला सांगितले की, त्यांची बहीण माझी खूप मोठी फॅन असून तिला मला भेटायचे आहे. त्यानंतर बहिणी सोबतच मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. मला त्यांचे संपूर्ण कुटुंबच प्रचंड आवडले. त्याच दरम्यान आमची खूप चांगली मैत्री झाली. मी अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत होते. मी दिवसाला अनेक ऑडिशन्स द्यायचे. त्यावेळी ते देखील माझ्या सोबत यायचे. काही दिवसांत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो." आपल्या प्रेमकथे विषयी सुधा पुढे सांगतात, "आम्ही लग्नाचा विचार केल्या नंतर आमच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. पण मी माझ्या जातीतील मुलाशी लग्न करावे आणि त्यातही तो मुलगा चित्रपटसृष्टीशी संबंधित नसावा अशी माझ्या आईची इच्छा होती. मी देखील आईला सांगितले होते की, तुझ्या आशीर्वादा शिवाय मी लग्नच करणार नाही. त्यानंतर काही वर्षांनी माझी आई आमच्या लग्नासाठी तयार झाली आणि आम्ही एका देवळात लग्न केले."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा