राम पटवर्धन
सत्यकथा’ आणि ‘मौज’ या दोन वाङमयीन नियतकालिकांद्वारे मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी संपादनाचा मापदंड निर्माण करतानाच अनेक साहित्यिक ‘घडविणारे’ ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन
जन्म. २१ मार्च १९२८
राम पटवर्धन ऊर्फ आप्पांनी शालेय शिक्षण रत्नागिरीत संपवून मुंबईत येऊन त्यांनी बीए, एमए केले. शिक्षणासोबत सरकारी नोकरीही केली. सिडनेहॅम, रुइया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले. एमए करतानाच मौजच्या श्री. पु. भागवतांनी त्यांना मौजेत येण्याचा आग्रह केला व ते मौजेच्या गिरगावातील कार्यालयात रुजू झाले. १९९४ पर्यंत त्यांनी मौजमध्ये संपादकपद भूषवले. परंतु त्यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मौजच्या पुस्तकांवर पटवर्धनांचा शिक्का असे. एका कथेचे सहा, सात वेळा पुनर्लेखन करून घेतल्यानंतरच तिला ते सत्यकथेत स्थान देत. नवोदितांप्रमाणेच प्रस्थापितांनाही सत्यकथेत कथा प्रसिद्ध झाल्याचे अप्रूप वाटे, ते याचमुळे. खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी अशा पेहरावात कायम असणार्या. पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखक मौजच्या कार्यालयात नेहमी येत. ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत, अशी त्यांची ख्याती होती. पटवर्धनांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यिअरलिंग’ या कादंबरीचा ‘पाडस’ या नावाने केलेला अनुवाद प्रचंड गाजला. अनुवाद कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून आजही पाडसचे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांनी अचला जोशी यांच्या श्रद्धानंद महिला श्रमाविषयी लिहिलेल्या ‘आश्रम नावाचं घर’ या भल्यामोठ्या पुस्तकाचे संपादन केले. ‘नाइन फिफ्टी टू फ्रीडम’ या पुस्तकाचा ‘अखेरचा रामराम’ या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक ‘योगदीपिका’ या नावाने मराठीत आणले. राम पटवर्धन ३ जून २०१४ रोजी निधन झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق