‘काठी न् घोंगडं घेऊद्या की रं…’ या गाण्यामधून जाती व्यवस्थेवर आघात करून ‘तुमच्यात सामील होऊ द्या’, अशी सामाजिक समतेची हाळी देणाऱ्या शाहीर निवृत्ती पवार
जन्म. ३० जून १९२३
सातारी झटका असलेला खणखणीत आवाज ही शाहीर निवृत्ती पवार यांची ओळख. ‘काठी न घोंगडं..., शिवाय ‘मैना गं मैना, तुझी हौस पुरवीन’, ‘या शेजारणीनं बरं नाय केलं’, ‘सूर्य उगवला.’..या गाण्यांनी मराठी रसिकांना भुरळ घातली. निवृत्ती पवार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देगावचा. बालपण चिंचनेर निंब या ठिकाणी गेले. आई हौसाबाईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत शाहिरीचे बीज पवारांमध्ये रुजले. वयाच्या आठव्या वर्षांपासून ते पोवाडे सादर करू लागले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत ते गात. शाहिरांचे वडील, बाबुराव मुंबईत मिठाचा व्यवसाय करायचे. त्यांना मदत करायला शाहीर चौदाव्या वर्षी मुंबईत आले. सोळाव्या वर्षी बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी गायलेल्या अभंगाला म. गांधींची कौतुकाची थाप मिळाली होती. १९४६ मध्ये गिरगावच्या ब्राह्मण सभेत बालगंधर्व, राम मराठे, अप्पा पेंडसे यांच्या उपस्थितीत ‘लोक सारे चला रे... राष्ट्रास हाक द्या रे’ हे समरगीत त्यांनी गायले आणि खुद्द बालगंधर्वांकडून वाहव्वा मिळवली. १९४२ ची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मराठी भाषेची चळवळ, गिरणी कामगारांचा लढा अशा अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी कवने केली आणि गायली. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मल्हारराव होळकर यांच्यावरील त्यांचे वीररसपूर्ण पोवाडे अंगावर रोमांच उभे करत असत. ‘परतिसर परसन, लावली चरण’ हे वासुदेवगीत त्यांनी मुंबई दूरदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी गायले होते. या गीतात बारकावे आणण्यासाठी ते माहुलीत जाऊन प्रत्यक्ष वासुदेवांबरोबर काही दिवस राहिले होते. ‘काठी न् घोंगडं’च हे गाणं शाहीरांनी गायले १९७५ मध्ये. पण त्याचे रेकॉर्डिंग एचएमव्हीने १९७७ साली केले. रेकॉर्डिंग दरम्यान काही केल्या गाण्यात मजा येईना. त्यावेळी एच.एम.व्ही.मध्ये असलेल्या श्रीनिवास खळे यांनी गाण्याच्या सुरुवातीला ‘ओ राम्या राम्या....हं’, अशी हाळी सुचवली. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस ती वापरली आणि गाणे जिवंत झाले. सुमारे १२५ ते १५० लोकप्रिय गाणी त्यांच्या नावावर आहेत.अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. शाहीर म्हणून कौतुक, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतात जेवढे व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही. मराठी मातीतील या अस्सल शाहिराची शासन दरबारी तसेच लोकदरबारी फार मोठी उपेक्षा झाली.१० जून २००२ मध्ये पसरणीत झालेल्या शाहिरीच्या शिबिरातच हृदयविकाराच्या झटक्याने निवृत्ती पवार यांचे निधन झाले.
शाहीर निवृत्ती पवार यांची गाजलेली गाणी.
पहाटच्या पाऱ्यामंदी माझा कोंबडा घाली साद., अगं मैना गं, मैना तुझी हौस पुरविन, तुला जोडीनं सातारा फिरवीन..., दादा टपोरं कणसा वरं, बघ आल्याती पाखरं.., मोटकरी दादा तुझी खिल्लारी बैलं बिगिनं मोटला जोडरं, तुझ्या हिरीचे गारगार पाणी पाटा पाटानं झुळझुळ सोडरं., काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा