नावातच दुर्गा आणि प्रत्यक्षातही दुर्गा
श्रेष्ठ मराठी लेखिका; लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक; समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्धधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या दुर्गा भागवत,आज जयंती (१० फेब्रुवारी १९१०-मृत्यू: ७ मे २००२ ).. जन्म इंदूर येथे. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नासिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करुन म.गांधीच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसीस ऑफ प्रूबंधासाठी सिंथिसीस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिंन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. म. गांधी, टॉलस्टॉय, हेन्री डेव्हीड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होत.
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे (१९५८-६०) समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्पूडन्स (१९३८) हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत. व्यक्तिचित्र व वाङमयविवेचन (१९४७) आणि पहिला मराठी ललितग्रंथ महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका-(१९५६) हा होय.
संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी (१९४०); बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर (१९४६); मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (१९५०); भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.(अधिक माहिती मराठी विश्वकोष )
आणिबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पतकरला. कराड येथे भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९७५) व तेथेच त्यांनी आणिबाणीवर तोफ डागली . नारायण यांची तब्येत चागली राहावी म्हणून त्यांनी संमेलनातच प्रार्थना केली . त्यावेळी यशवंतराव चव्हाण उपस्थित होते त्यांचेकडे बघून त्या म्हणाल्या यशवंतराव उठा जयप्रकाशजिंसाठी प्रार्थना करूया . त्यानंतर लगेचच त्यांना कारावासात जावे लागले ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा