वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे
जन्म.१८९२ रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे येथे.
आपल्या प्राणप्रिय मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचे यज्ञकुंड धगधगते ठेवणारे हे अनंत कान्हेरे! इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले.
त्यांची शरीरयष्टी काही धिप्पाड नव्हती, तर तशी किरकोळच होती, पण लहानपणापासूनच मनाने ते अतिशय खंबीर व निश्चयी होते. नाशिक येथे शिक्षण चालू असतानाच. त्यांनी पिस्तुल चालविण्याचे व नेमबाजीचे शिक्षण घेतले. वंगभंग चळवळीमुळे महाराष्ट्रात जेव्हा असंतोष खदखदत होता, त्या वेळी नाशिकला असणा-या कलेक्टर जॅक्सनने बाबाराव सावरकरांना अंदमानात पाठविले. देशभक्तांचे खटले चालविणा-या खरे वकिलांची सनद रद्द केली. तांबे शास्त्रींच्या प्रवचनांवर बंदी घातली. त्यामुळे तेथील क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनला मारण्याचे ठरविले व ती जबाबदारी अनंत कान्हेरे यांनी स्वीकारली. ते योग्य संधीची वाट पाहात त्याच्या मागावरच होते. नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता. २१ डिसेंबर १९०९.
जॅक्सन यांना ठार मारल्यावर अनंत कान्हेरे यांनी स्वतलाच मारुन घेण्याचे ठरवेल होते. पण त्यापूर्वीच ते आजूबाजूच्या जॅक्सन यांच्या सहकार्यांीकडून पकडले गेले, त्यामूळे त्यांचा तो हेतू साध्य झाला नाही.पोलिसांनी त्यांना पकडले तेव्हा, माझे कर्तव्य मी केले आहे. मी निसटून जाऊ इच्छित नाही असे उदगार त्यांनी काढले. अंनत कान्हेरे यांच्यावर खटला चालून त्यांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आले. त्या वेळी भारत माता कि जय व क्रांती चिरायू होवो, असे उदगार काढून ते आनंदाने फाशी गेले.
अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तीन क्रांतीवीरांची शौर्यगाथा पडद्यावर ‘१९०९’ हा चित्रपट निर्माते अजय कांबळी यांनी २०१३ मध्ये प्रदर्शित केला होता. याचे लेखन आणि दिग्दर्शन अभय कांबळी यांचे असून दिलीप अल्लम हे सहनिर्माते आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा