कवी बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय
जन्म. २७ जून १८३८ नैनिताल येथे.
कलकत्ता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्नम केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंकिमचंद्र खूप संतप्त झाले. सन् १८७६ चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.
‘आनंद मठ' या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले व ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वंदे मातरम् हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले आणि या गीताला खूप लोकप्रियता मिळाली. १८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गाऊन अख्खे अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत जागृतीचा शंखनाद बनले. हिदू-मुस्लिम सर्वांनी मुक्त कंठाने याचे गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. १९०४ मध्ये भगिनी निवेदिता यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम् असे लिहिले. वंदेमातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता की भगिनी निवेदिता यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. १९०७ मध्ये त्यांनी वंदे मातरम् लिहिलेला हा ध्वज बर्लिन येथे फडकविला.
वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला. आजही 'वंदे मातरम् करोडो भारतीयांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे,
बंकिंम चंद्र हे सरकारी महाविद्यालयात प्राध्यापकही होते. बंकिंम चंद्रांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या. *बंकिंम चंद्र* यांचे ८ एप्रिल १८९४ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा