महावीर जयंती
शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म दिवस हा महावीर जयंती उत्सव किंवा महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो.
जैन धर्मियांच्या म्हणण्यानुसार भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९अथवा इसवी सन पूर्व ६१५ मधील चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी या तिथीला झाला.
भगवान महावीर यांचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी भगवान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीर यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला होता. पण 30 वर्षांचे झाल्यावर त्यांनी संन्यास घेतला. अध्यात्माची वाट धरली.
वर्धमानाने तपश्चर्या केली. तब्बल 12 वर्ष कठोर तपस्या करून त्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला. निडर, सहनशील आणि अहिंसक झाले. याच कारणामुळे त्यांना भगवान महावीर या नावाने नागरिक ओळखू लागले. महावीर यांना 72 व्या वर्षी पावापुरी येथे मोक्षप्राप्ती झाली.
महावीर जयंती हा उत्सव साजरा करण्यासाठी जैन धर्मिय मिरवणूक काढतात. शोभायात्रा निघते. या शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या सोन्याच्या मूर्तीवर चांदीच्या कलशातून जलाभिषेक केला जातो. शोभायात्रेदरम्यान जैन धर्मगुरु नागरिकांना भगवान महावीर यांचा उपदेश नागरिकांना सांगतात. भगवान महावीर यांनी आखून दिलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करण्यास सांगतात.
राजेशाही आयुष्याचा त्याग करून संन्यास घेणाऱ्या भगवान महावीर यांनी माणसांना अंधारातून प्रकाशाकडे नेले. भगवान महावीर यांनी केलेल्या उपदेशात पाच प्रमुख सिद्धांत आहेत. या सिद्धांतांना पंचशील सिद्धांत असेही म्हणतात.
सत्य, अहिंसा, अस्तेय अर्थात चोरी न करणे, अपरिग्रह अर्थात भौतिक सुखांचा लोभ नसणे, ब्रह्मचर्य हे पंचशील सिद्धांत भगवान महावीर यांनी सांगितले. या पाच सिद्धांतांचे पालन केले तर मोक्षप्राप्ती होते असे भगवान महावीर सांगत.
आजही भारतात अनेक ठिकाणी महावीर जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची, शोभायात्रा काढण्याची पद्धत आहे. या निमित्ताने गरजूंना दान केले जाते. या दानात प्रामुख्याने अन्न, वस्त्र, पैसे (धन) यांचा समावेश असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा