हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, गानसरस्वती किशोरी आमोणकर
जन्म. १० एप्रिल १९३१ मुंबई येथे.
किशोरी आमोणकर यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका होत्या. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. १९९२ मध्ये रवी आमोणकर यांचे निधन झाले. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.
परदेशात अनेक कार्यक्रम करणाऱ्या किशोरीताईनी अनेक गुणी शिष्यांनाही मार्गदर्शन केले व त्यांचे गुरूस्थान स्वीकारले. माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरी आमोणकर यांच्या शिष्यवर्गांत मोडतात. त्यांनी ‘स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. किशोरी अमोणकर यांनी चित्रपटासाठी तसं कमीच गायन केलं. ’गीत गाया पत्थरोंने’आणि ’दृष्टी’या मोजक्या दोन चित्रपटाला त्यांनी आवाज दिला. या गाण्याबद्दल स्वतः किशोरी ताई म्हणाल्या होत्या की चित्रपटात गाण्यासाठी त्यांच्या गुरु आणि आई मोगुबाई कुर्डीकर यांनी विरोध केला होता. त्यांनी सरळ सांगून टाकले होते कि "तू जर चित्रपटात गायलीस तर माझ्या दोन्ही तानपुऱ्यांना हात लावायचा नाही".
विरोधानंतरही किशोरी ताई ’गीत गाया पत्थरोंने” या चित्रपटासाठी गायल्या आणि रातोरात हे गाणं लोकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालं. चित्रपटातल्या या दमदार पदार्पणाने प्रस्थापित गायक-गायिकांचे धाबे दणाणले. या नंतर एक अतर्क्य घटना घडली. किशोरीताईंच्या आवाजातील गाण्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड कुणीतरी रातोरात विकत घेतल्या आणि ही रेकॉर्ड सामान्य माणसांना मिळणार नाही याची व्यवस्था केली. या कटू अनुभवानंतर किशोरीताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. अपवाद फक्त दृष्टी या १९९० सालच्या ’दृष्टी’ चित्रपटातील गाणं.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, संगीत सम्राज्ञी पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, किशोरी आमोणकर यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते. किशोरीताईंच्या सांगीतिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी पुण्यात गानसरस्वती महोत्सव आयोजित केला जातो. किशोरी आमोणकर यांचं ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झालं.
किशोरी आमोणकर यांची गाजलेली मराठी गाणी :
अवघा रंग एक झाला, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी, हे श्यामसुंदर राजसा, अवचिता परिमळु, कानडा विठ्ठल, अवघा तो शकुन, जनी जाय पाणियासी, जाईन विचारित रानफुला, पडिलें दूरदेशीं, पाहतोसी काय आता पुढे, मी माझें मोहित राहिलें, या पंढरीचे सुख, सोयरा सुखाचा विसांवा.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق