आज मानवी कम्प्युटर असे संबोधल्या जाणाऱ्या गणिती शकुंतला देवी
जन्म. ४ नोव्हेंबर १९२९
शकुंतला देवी यांचा जन्म बेंगलोरमधील. पारंपरिक कन्नड ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
त्यांच्या वडिलांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे भिक्षुकी आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्यास नकार देत सर्कसमधील नोकरी पत्करली. शकुंतला देवी फक्त तीन वर्षांच्या असताना, त्यांना खेळण्याच्या पत्त्यातील काही ट्रिक शिकवत असताना त्यांची कुशाग्र बुद्धी आणि स्मरणशक्ती वडिलांच्या लक्षात आली. मग त्यांनी सर्कशीतील नोकरी सोडून देऊन छोट्या शकुंतलेला घेऊन तिच्या स्मरणशक्तीवर आधारीत रस्त्यावरील खेळ करायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांचं कसलंही औपचारिक शिक्षण झालं नव्हतं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी मैसूर विद्यापीठात आपल्या कुशाग्र बुद्धीचा नमुना पेश केला. शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला रवाना झाल्या. १९४४ ला लंडनला गेल्यावर त्यांनी संपूर्ण जगाची सफर केली. आपल्या बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार त्यांनी संपूर्ण जगभरात दाखवून आपल्या कौशल्याची दखल घ्यायला भाग पाडलं. ६० च्या दशकात त्या भारतात परतल्या. परितोष बॅनर्जी यांचा विवाह झाला. कोलकात्याचे रहिवासी असलेले परितोष आयएएस होते. या जोडप्याचा १९७९ मध्ये घटस्फोटही झाला. त्यानंतर त्या बेंगलोरला परतल्या. १९५० मध्ये युरोप आणि १९७६ मध्ये अमेरिकेत त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवून दिली. आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षाही अधिक वेगाने गणिते पूर्ण करून त्याचीउत्तरे परिक्षकांना हजर केली. १९८० मध्ये त्यांनी संगणकालाही पराभूत केल्याची नोंद करण्यात आली. १३ आकडी दोन संख्याचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला होता. १८ जून १९८० मध्ये त्यांना 7,686,369,774,870×2,465,099,745,779 अशा दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इंपिरीयल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले. त्यासाठी कोणतंही लॉजिक नव्हतं. त्यानंतर त्यांनी या दोन आकड्यांचा बिनचूक गुणाकार करून 18,947,668,177,995,426,462,773,730 हे उत्तर दिलं ते ही फक्त २८ सेकंदात. या साठी गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शकुंतलादेवी यांचे नाव नोंदविण्यात आले होते. त्यांच्या या कुशाग्र बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुकने करताना याच घटनेचा उल्लेख केला आहे. पुन्हा १९८८ मध्ये त्या अमेरिकेला गेल्या. यावेळी त्यांना विशेष आमंत्रण होतं, बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचं. या विभागातील एक प्राध्यापक आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन सुरू केलं. प्राध्यपक जेन्सन यांनी त्यांच्यावर अनेक प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं धनमूळ काढणं किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा आठवा घात काढायला सांगितलं की त्या क्षणात उत्तर हजर करायच्या. जेन्सन यांनी असं नमूद केलंय की आपल्या वहीन पूर्ण आकडा लिहिण्यापूर्वीच त्यांना सांगितलेलं गणित त्या सोडवायच्या. १९९० मध्ये इंटेलिजन्स या ख्यातकिर्त जर्नलमध्ये प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी शकुंतला देवींविषयीचा प्रबंध प्रकाशित केला. आपल्या गणितीय कौशल्याशिवाय शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामध्ये फलज्योतिषासह, पाककला आणि अनेक कादंबऱ्याचाही समावेश आहे. त्यांनी समलैंगिकतेविषयीही एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय. 'फन विथ नंबर्स,' 'अॅस्ट्रॉलॉजी फॉर यू,' 'पझल्स टू पझल यू' आणि 'मॅथाब्लिट' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शकुंतला देवी या च्या मागे अनुपमा बॅनर्जी ही एक मुलगी आहे. शकुंतला देवी यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त गूगलने खास कॅलक्युलेटर स्टाईलमध्ये डूडल बनविले होते. गेल्यावर्षी शकुंतलादेवी यांच्यावर चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला होता.शकुंतला देवी यांचे निधन २१ एप्रिल २०१३ रोजी झाले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق