कवी ग्रेस
जन्म. १० मे १९३७
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसर्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस.
ग्रेस यांची "ती गेली तेव्हा' ही कविता ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, तेव्हा आईला तिरडीवरून नेताना त्यांना सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कवितासंग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली. त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. ग्रेस यांचं मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. "वार्या ने हलते रान" ह्या त्यांच्या ललितलेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललितलेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. नागपूरला येथे इंग्रजी विषयाचे प्रा. त्याचबरोबर सौंदर्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकवला.त्यांनी ई-मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीड संबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. *ग्रेस* यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
*ग्रेस यांचे कवितासंग्रह*
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)
ललितबंध संग्रह-
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)
🙏🙏🙏👍
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق