आज पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस
जन्म. १२ फेब्रुवारी १७४२ सातारा येथे.
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील.
बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १९व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी सरदार शिंदेच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणवीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणवीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’
नाना फडणवीस हे तब्बल २० वर्षे ते मराठा साम्राज्यातील पेशवेच्या कडील बडे प्रस्थ होते. त्यांच्या दराऱ्याबरोबरच त्यांची आणखी एक ओळख होती ‘नवकोट नाना’ (नऊ कोट्यधीश) अशी. त्यांच्या याच ‘आर्थिक’ साम्राज्यावर इंग्लंडमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमुळे पुराव्याची मोहोर उमटली आहे.
नाना फडणवीस यांच्या संपत्तीच्या सत्यासत्यतेबाबत कालौघात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच पार्श्वभूमीवर, सन १७९६ ते १८०० कालावधीतील नानांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंडमध्ये (आरएएस) सापडले. त्यात, आपली पाच कोटी नव्वद लाखांची संपत्ती असल्याचा उल्लेख खुद्द नानांनीच केला आहे. त्यांच्या या संपत्तीची आजच्या बाजारभावातील किंमत कैक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. लंडनमधील आरएएसमध्ये दुर्लक्षित पडलेल्या २०० हून अधिक कागदपत्रांपैकी एक असे हे पत्र आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या सर चार्ल्स मॅलेट यांनी १७९७ मध्ये पुण्यातून इंग्लंडला परतताना येथील ऐवज सोबत नेला होता. त्यानंतर तो आरएएसकडे सोपवण्यात आला.
इतिहासाच्या या विस्मृतीत गेलेल्या खुणा नव्याने समोर येण्याचे श्रेय जाते इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांना. आरएएसच्या कॅथी लॅझेंबॅट्ट या ग्रंथपालांशी संपर्क साधून त्यांना या दस्तावेजाचे महत्त्व पटवून देत त्याचा शोध घेतल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. आरएएसच्या अर्काइव्ह सिस्टीममध्येही ही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे २०१३ मध्ये लंडनला जाऊन या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
सन १७५७ मध्ये बाजीराव पेशवे यांनी दत्ताजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रापासून पुढील तपशील यामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय पानिपतासंदर्भातील तपशीलाचा समावेश असलेल्या रघुनाथ यादव चित्रगुप्त लिखित ‘बखर ऑफ पानिपत’ या ७० पानी दस्तावेजाचाही यामध्ये समावेश आहे. अनेक महत्त्वाची कागदपत्रे हरवली असली तरी नाना फडणवीस यांच्या संदर्भातील कागदपत्रे मात्र मूळ, अस्सल आहेत. नानांच्या पत्नीनेच हा संदर्भ ब्रिटिशांच्या स्वाधीन केला होता. यामध्ये नानांच्या आत्मचरित्राचाही समावेश असून तरुण वयात त्यांना असलेल्या महिलांप्रतीच्या आकर्षणाचीही स्पष्ट कबुली यामध्ये आहे. पहिले माधवराव पेशवे आणि रघुनाथराव यांच्यातील व्यवहाराचा नाना फडणवीस यांनी तयार केलेल्या तपशिलाचाही उपलब्ध कागदपत्रांमध्ये समावेश आहे. तसेच नारायणरावांच्या हत्येविषयीच्या माहितीचेही कागद यामध्ये आहेत.
नाना फडणवीसांचा २४८ वर्ष जुना मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच दहा कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.
नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखाने उभा आहे. दीड एकर परिसरात बांधलेल या वाडय़ात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथर्यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या साहाय्याने आणि भित्तीचित्राच अनोख्या शैलीने १७७० च्या दरम्यान बांधलेल्या या वाडय़ाची देखभाल त्यांचे खापरपणतू अशोक फडणवीस आजही करीत आहेत.
वाडय़ामध्ये हळदीकुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मीटर खोल कुंड आहे. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरवले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यामधून निचरा होणारे पाणी वाडय़ाच्या पाठीमागील भिंतीमधून बंदिस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. वाडय़ाच्या बाह्य तटबंदीवर खिडक्या आहेत. तत्कालीन संरक्षण गरजेनुसार त्या बांधल्या आहेत.
या वाडय़ाला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे पंधरा फूट आहे. वाडय़ाच्या चुना-विटामध्ये बांधलेल्या भिंतीस आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांड चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्ती चित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करून गुळगुळीत केली आहे. येथील चित्रांची मांडणी आणि रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशावताराचा, अष्टविनाकाचा समावेश आहे.
या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर आणि गलटय़ावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत. फिकट पिवळ रंगाने छत रंगविले आहे.
धकाधकीच राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून नानांनी हा वाडा बांधला. परंतु राजकारणाच्या व्यापामुळे फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.
कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी पायर्यांचा घाट आहे. हा वाडा मराठा वास्तुशैलीत बांधला आहे. आजही पर्यटक पाहण्यासाठी आर्वजुन येतात.
नाना फडणवीस यांचे निधन १२ मार्च १८०० रोजी झाले.
🙏🙏🙏
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق