मराठी संशोधक
यशवंत खुशाल देशपांडे
जन्म. १४ जुलै १८८४ विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापळ ह्या गावी.
त्यांचे वडील हे अकोला जिल्ह्यातील धनज ह्या गावी सब-रजिस्ट्रारच्या हुद्यावर होते. यशवंतरावांचे प्राथमिक शिक्षण धनज येथेच झाले. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी अनुक्रमे अमरावती आणि मुंबई येथे घेतले. मुंबई विद्यापीठाच्या एम्. ए. व एल्एल्. बी ह्या पदव्या मिळविल्यानंतर यवतामाळ येथे त्यांनी वकिली सुरू केली. १९४० पर्यंत ते ह्या व्यवसायत होते. मुंबईस महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि इतिहासाचार्य राजवाडे ह्यांच्या कार्याने ते प्रभावित झाले होते. तो संस्कार बलवत्तर ठरून ते संशोधनकार्याकडे वळले. १९२६ साली यवतमाळ येथे ‘शारदाश्रम’ नावाची एक संस्था स्थापन करून त्यांनी संशोधन, संग्रहादी कार्यांसाठी सुविधा निर्माण केली. भारतभर संचार करून मठमंदिरांतून संस्कृत-मराठी ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, नाणी, मूर्ती, छायाचित्रे इ. ऐतिहासिक संशोधनाची साधने त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमविली. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारे अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले. ‘शारदाश्रम’ तर्फे निघालेल्या शारदाश्रम वार्षिकाचे ते संपादक होते. थिऑसाफिकल सोसायटी आणि प्राच्यविद्यापरिषद ह्यांच्या कार्यातही त्यांनी रस घेतला. १९३९ मध्ये झुरिक येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना लाभला होता. ब्रूसेल्स येथे झालेल्या प्राच्यविद्यापरिषदेलाही ते गेले होते. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन ह्या संस्थेचे सन्मान्य सदस्यत्व त्यांना देण्यात आले होते. महानुभाव पंथासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधन-लेखनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. महानुभाव वाङ्मयाचा साकल्याने परिचय घडवून आणण्याच्या हेतूने त्यांनी महानुभावीय मराठी वाङ्मय हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर अगदी पंजाब, पेशावरपर्यंत त्यांनी प्रवास केला;
विविध महानुभाव मठांना भेटी देऊन आणि त्या पंथातील अनेक महंतांशी संपर्क साधून माहिती गोळा केली. महानुभावांचे अनेक ग्रंथही पाहिले. श्रीऋद्धिपुरवर्णन , श्री चक्रपाणी-चरित्र, पंडित भीष्माचार्य संकलित निरूक्तशेष ह्यांसारख्या महानुभावीय ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे. विदर्भातील ऐतिहासिक लेखांचा एक संग्रहही त्यांनी संपादिला आहे . माझी शांती ही एक कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. यशवंत देशपांडे यांचे २० नोव्हेंबर १९७० रोजी निधन झाले.
🙏🙏
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق