१९ सप्टेंबर*
आज सुप्रसिद्ध संगीतकार व कवी दत्ता डावजेकर यांचा स्मृतिदिन.*
जन्म. १५ नोव्हेंबर १९१७
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या् डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २० रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.
त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवल कोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. १९९२ साली डी.डीं नी शेवटचा चित्रपट केला. घास रोज अडतो ओठी, आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी, कुणि बाई, गुणगुणले, गीत माझिया हृदयी ठसले, गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना, गेला कुठे माझा राजा, ते तुझ्या हाती, जे स्वप्नी पाहिले रे, गोपाला अशा एकाहून एक अवीट गाण्यांचे संगीत डावजेकरांनी दिले. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा आदी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.
दत्ता डावजेकर यांच्यावर ‘स्वरसाक्षी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक कोणा एका लेखकाने लिहिलेले नाही. त्यांच्याशी उत्तम स्नेहसंबंध असलेल्या व्यक्तींना त्यांचे ‘डीडी’ कसे भावले, संगीतकार म्हणून त्यांचे कोणते मनोहर वाटले हे सारे या व्यक्तींनी लेखांमधून उलगडले
आहे. या पुस्तकात संगीतकार अशोक पत्की, कवी प्रवीण दवणे, निवेदिका मंगला खाडिलकर, मधू पोतदार, रत्नाकर पिळणकर, चित्रपट समीक्षक व पत्रकार सुधीर नांदगावकर, संगीततज्ज्ञ डॉ. मृदुला दाढे-जोशी, डॉ. चारुशीला दिवेकर, अंकुश चिंचणकर, सुराज साठे आदी २५ नामवंतांचे लेख आहेत. गायक जयवंत कुलकर्णी यांनी डावजेकरांसंदर्भात काही आठवणी लिहून ठेवल्या होत्या. त्याही या पुस्तकात आहेत.
दत्ता डावजेकर यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा