विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

सरदार उधमसिंग

                             

  

  * सरदार उधमसिंग* 


*संघटना : गदर पार्टी, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, इंडियन वर्कर्स असोसिएशन*

*चळवळ : भारतीय स्वातंत्र्य*  चळवळ*


 ध्येय कितीही असाध्य असले तरी ज्यांचे सर्वस्व त्या ध्येयासाठी अर्पिलेले असते आणि ज्यांचे आदर्श उत्तुंग असतात ते आपले ध्येय अखेर साध्य करतातच. असाच एक महान ध्येयवादी म्हणजे ‘पंजाबशार्दूल’ हुतात्मा उधमसिंग.

उधमसिंगांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी पतियाळातील ‘सुनाम’ खेड्यात झाला. त्यांचे मूळ नाव उदयसिंह असे होते, पुढे ते उधमसिंग असे झाले. अवघे तीन वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले व काही वर्षातच पितृछत्रही हरपले. ते व त्यांचे बंधू साधुसिंग हे दोघे अनाथ झाले.त्यांना चंचलसिंह यांनी आपल्या अमृतसरच्या रामबाग येथील अनाथाश्रमात आणले. लवकरच भावाचे देहावसान झाले व उधमसिंग जगात एकाकी उरले. त्यांनी कोळशाने चित्रे काढणे, सुतारकाम, लोहारकाम वगरे करून उदरनिर्वाहास सुरुवात केली व ते काहीसे स्थिरावू लागले होते, तोच तो काळा दिवस उजाडला. जनरल डायर व मायकल ओडवायर यांनी जालियनवाला बागेत जमलेल्या नि:शस्त्र व निरपराध लोकांवर बेछूट गोळीबार करून ३३१ मोठी माणसे, ४१ बालके व एक सात महिन्यांची तान्ही मुलगी असे ३७३ अमानुष खून पाडले तर १५०० जणांना जखमी केले. (दि. १३ एप्रिल १९१९). याच जखमींमध्ये एक उधमसिंग होते. त्यांच्या हाताला गोळी लागली, मात्र ते कोसळले व त्यांच्या अंगावर एक मृतदेह कोसळल्याने ते वाचले व त्यांना आणखी गोळ्या लागल्या नाहीत. मुळात क्रांतिकार्याकडे आकर्षित झालेले व वाचनाने जागृत झालेले उधमसिंग या घटनेने प्रक्षुब्ध झाले व त्यांनी मारेकर्‍यांना देहांत शासन देण्याची घोर प्रतिज्ञा केली.

हिंदू – मुस्लिम ऐक्याच्या भावनेने भारलेल्या उधमसिंगांनी ‘राम महंमदसिंग आझाद’ असे हिंदू-मुसलमान-शीख या सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे नाव धारण केले. ग्रंथवाचन, जहाल वक्तव्य यामुळे ते लवकरच काही क्रांतिकारक तरुणांच्या वर्तुळात सामावले गेले ज्यांत प्रत्यक्ष भगतसिंगही होते. जणू उधमसिंगांना आपला मार्ग सापडला.जालियनवाला बागेच्या घटनेनंतर त्यांनी अनेक पुस्तके, वर्तमानपत्रे वाचली व त्यांना समजून चुकले की डायर व ओडवायर यांनी आधीही अनेक नीच कृत्ये केलेली आहेत, जसे सरदार अजितसिंग (भगतसिंगाचे सख्खे काका) यांची देशाबाहेर तडीपारी, १९१४ च्या गदर उत्थानातील विष्णू गणेश पिंगळे, सरदार सोहनसिंग भकना, पृथ्विसिंह आझाद इ. प्रभृतींवर निर्बंधित न्यायालयात एकतर्फी खटले चालवून त्यांना फाशी देण्याची सूचना व आग्रह. त्यांचा या नीचांना निजधामास पाठवण्याचा निर्धार पक्का झाला. इकडे क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावर असल्याने पोलिसांचा ससेमिरा मागे लागला व तो चुकविण्यासाठी ते एका लाकडाच्या व्यापार्‍याबरोबर खोट्या पारपत्राच्या आधारे पूर्व आफ्रिकेत पळून निसटले. तिथून ते अमेरिका, जर्मनी वगैरे बरेच भटकले. त्यांना भगतसिंगांचा दारुगोळा व शस्त्र घेऊन येण्याचा निरोप मिळाला व एका जर्मन युवतीसह ते हिंदुस्थानात दाखल झाले (१९२७ मध्ये मात्र एका खबर्‍याच्या चहाडीमुळे ते अमृतसर येथे पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. उधमसिंग सशस्त्र असल्याची खबर असल्यामुळे पोलीस सावध होते. उधमसिंगांना अटक झाली तेंव्हा त्यांच्या अंगावर एक कोल्ट रिवॉल्वर व १३९ काडतुसे सापडली. उधमसिंगांना पाच वर्षे कारावास झाला. मात्र सुटका होताच ते गुपचूप देशाबाहेर निसटले व रशिया, इजिप्त, ऍबिसिनीया, फ्रान्स, जर्मनी असे भटकत अखेर इंग्लंड मध्ये येऊन ठेपले (१९३३). इथे त्यांनी ‘राम महंमदसिंग आझाद’ याच नावाने बनावट पारपत्राच्या आधारे प्रवेश मिळवला होता. त्यांनी लंडनमधील सुरुवातीचे दिवस अतिशय हलाखीत काढले. ते अनेकदा हिंदी तरुणांच्या समूहात जहाल भाषा वापरत असत. आपण इथे प्रतिशोध घेण्यास असल्याचा उल्लेख त्यांनी कधी बोलताना केलाही होता. डायर तोपर्यंत मरण पावला होता. ओडवायर हयात होता. उधमसिंग मोटर चालविण्यास शिकले होते. आपण एकदा ओडवायरचे सारथ्य करून त्याला नीट पाहून ठेवले आहे असे ते सांगत असत. एक दिवस त्याला मारून मी भगतसिंगासारखा फासावर जाईन असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. पण त्याकडॆ कुणी फारसे लक्ष दिले नाही. पुढे योगायोगाने त्यांना शिवसिंग जोहल यांचा आसरा मिळाला. शिवसिंग हे लंडनमध्ये स्थायिक असले तरी मूळचे हिंदुस्थानी होते, काकोरी धमाक्याचे जनक रामप्रसाद बिस्मिल यांच्या वडिलांना ते ओळखत होते व त्यांचा साहजिकच क्रांतिकारक तरुणांना पाठिंबा होता.

इथे उधमसिंग स्वातंत्र्य चळवळ चालवणार्‍या अनेकांच्या सान्निध्यात आले व त्यांचा परिचय व्हि. के. कृष्णमेनन व केसरी चे लंडन चे वार्ताहर दत्तोपंत ताम्हनकर यांच्याशी झाला व ते त्यांना भाषणे, सभा यात साहाय्य करू लागले.एक दिवस दत्तोपंत हाइड पार्क मध्ये भाषण देत होते. त्याचवेळी पलीकडेच ‘प्रिन्स ऑफ वेल्स टेरेस’, केन्सिंग्टन येथे राहणारा ओडवायर तेथून जात होता. त्याला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा उच्चार सहन झाला नाही. भाषण मध्येच थांबवत तो दत्तोपंतांवर ओरडला, "तुम्ही स्वातंत्र्याला पात्र नाही. आधी अस्पृश्यतेचे काय ते बोला." दत्तोपन्त उत्तरादाखल तेजस्वी मुद्रेने त्याला उत्तरले, " तू स्वत:च एक अस्पृश्य आहेस! " मग ते भाषण ऐकणार्‍यांना उद्देशून म्हणाले , "हा पाहा जालियनवाला बागेचा कसाई". हे सर्व पाहत व ऐकत असताना वरकरणी शांत दिसणारे उधमसिंग आतून खवळले होते. आता वेळ न घालवता याला संपवला पाहिजे.

दुसर्‍या महायुद्धाची धुमश्चक्री सुरू होताच ते ३६ ते ३९ च्या दरम्यान दोनवेळा युरोप ला जाऊन आले. जिनिव्हा येथे त्यांची भेट परागंदा देशभक्त सरदार अजितसिंग यांच्याशी झाली. मग ते ताश्कंदलाही जाऊन आले. स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्रयत्न असे सुरू होते. परत इंग्लंड येथे आल्यावर सक्तीच्या सैन्य भरतीवरून त्यांचा सरकारशी खटका उडाला. इंग्लंडला परत येताच त्यांना आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली. त्यांनी आपण ओडवायरला कंठस्नान घालणार असल्याचे शिवसिंग यांना सांगितले. मात्र शिवसिंग त्यांना म्हणाले की, तू तर बोलघेवडा वाटतोस, तुझ्या हातून काही होईल असे मला वाटत नाही. तेंव्हा उधमसिंग त्यांना म्हणाले की, ते सातत्याने त्याचाच विचार करत असून ते आपल्या प्रतिज्ञेशी बद्ध आहेत. मात्र त्यांना शक्यतो ओडवायर व भारतमंत्री याना एकाच वेळी मारायचे आहे. एक वध केला तर एकदा फाशी आणि दोन केले तरी एकदाच फाशी असा सरळ हिशेब होता. माझ्या देशाचे भवितव्य ठरवायला इंग्रज मंत्री लंडनमध्ये कशाला? असा त्यांचा सवाल होता. त्यांनी याच सुमारास आपण हिंदुस्थानात परत जाणार असल्याची बातमी पसरवली. आपण मोटारीने भूमार्गे प्रवास करणार असे सांगून त्यांनी लंडनच्या ‘ऑटोमोबाइल असोसिएशन’ कडून प्रवासाचे मार्गदर्शन व नकाशे वगैरे घेतले. तिथे त्यांना संरक्षणार्थ हत्यार ठेवायचा सल्ला मिळाला. पडत्या फळाची आज्ञा घेत त्यांनी शस्त्र पैदा केले. युद्धकाळात शस्त्राला काय तोटा? एका ब्रिटिश टॉमीला दारू पाजून त्यांनी अगदी स्वस्तात एक अमेरिकन बनावटीचे ‘स्मिथ ऍण्ड वेसन’ चे .४५५ चे रिवॉल्वर व २५ काडतुसे मिळविली. मात्र त्याने दिलेली काडतुसे बहुधा .४ ची व जुनी असावीत. त्यामुळे ती अगदी चपखल बसत नसत, त्यामुळे हत्याराचा पल्ला कमी झाला होता. मग त्यांनी ओडवायर राहतं असलेल्या केन्सिंग्टन भागात वर्दळ वाढवली व काहीतरी कारणाने प्रत्यक्ष ओडवायरशी ओळख करून घेत ती वाढवली व त्याला एकदा तर चहाचे निमंत्रणही दिले. या मागचा उद्देश त्याला नीट पाहून ठेवणे ज्यायोगे भलताच कुणी मारला जाणार नाही हाच होता. आता अशी शंका येणे स्वाभाविक आहे की त्यांनी इतक्या संधी असताना वध का केला नाही? त्याचे उत्तरही उधमसिंगनी दिले होते. त्यांच्या मते ओडवायर हा हिंदुस्थानचा गुन्हेगार होता व त्याला मारणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे; हे सर्वजणांच्या समक्ष भरसभेत पार पाडले पाहिजे, ज्या योगे सार्‍या जगाला समजेल की एका हिंदुस्थानी माणसाने याला का मारले ? हा सगळा प्रभाव भगतसिंग ह्या आदर्शाचा होता. इतक्या महान व्यक्तींच्या एका असामान्य कृत्याचे अनुकरण करावे असे वाटणारा शिष्यही असामान्य असावा लागतो.

आता सर्व तयारी सिद्ध होती. प्रतीक्षा होती ती योग्य संधीची. आणि लवकरच ती संधी चालून आली. ‘इंडिया ऑफिस’ च्या भिंतीवर त्यांना एक भित्तिपत्रक दिसले, त्यात १३ मार्च १९४० रोजी कॅक्स्टन सभागृहात ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ व ‘रॉयल एशियाटीक सोसायटी’ यांच्यातर्फे एका सभेचे आयोजन केल्याचे लिहिले होते. या सभेचे अध्यक्ष भारतमंत्री झेटलँड असून या सभेला उपस्थित राहणार्‍या आसामींमध्ये ओडवायर असल्याचे नमूद केले होते. ते वाचताच उधमसिंगांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या खुशीतच त्यांनी योजना आखली. १२ मार्च १९४० रोजी त्यांनी आपल्या सर्व मित्रांना मेजवानीला बोलावले आणि लाडवांचे जेवण घातले. ते अखेरचे सहभोजन !

१३ तारखेचा दिवस उजाडला. आपले स्मिथ अँड वेसन भरून, काही सुटी काडतुसे एका थैलीत घेऊन व समजा परदेशी हत्याराने दगा दिला तर कोटाच्या आतल्या खिशात एक सुरा टाकून ते झोकदार पोशाख करून निघाले व सभास्थळी पोहोचले. लॉर्ड झेटलँड व्यासपीठावर होते तर खाली समोरच्या पहिल्याच रांगेत अगदी डावीकडे ओडवायर बसलेला दिसला. सभेला बरीच गर्दी होती. लोक जागा नसल्याने भिंतीलगत उभे होते. त्यांना सरकावीत उधमसिंग शक्य तसे पुढे सरकत होते. झेटलँडचे भाषण संपले. आभार प्रदर्शन सुरू होताच कार्यक्रम संपणार म्हणून लोकांची चुळबुळ सुरू झाली. पुढे थोडी जागा होताच पटकन उधमसिंग पुढे सरकले व त्यांनी आपले रिवॉल्वर काढून गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिल्या दोन गोळ्यातच ओडवायर मेला. मात्र ते त्वेषाने गोळ्या झाडत राहिले. नंतरच्या दोन गोळ्या झेटलँडना लागल्या पण ते वाचले. मग प्रत्येकी एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टन व सर लुई डेन याना लागल्या. रस्ता सोडा असे सांगत उधमसिंग जाऊ लागताच एका वयस्कर बाईने त्यांना मागून कोट खेचून बेसावध अवस्थेत हटकले. अडखळलेले उधमसिंग स्वत:ला सावरत असतानाच क्लॉड रिचेस याने एका वायुदलाच्या शिपायाच्या साहाय्याने त्यांना अटक केली.

        घटनास्थळी अटक झालेले उधमसिंग – चेहेर्‍यावर भितीचा लवलेश नसून कर्तव्य पूर्तीचे समाधान आणि ओडवायरला मारल्याचा आनंद दिसत होता.

    ही बातमी प्रस्तुत होताच सर्वांना १९०९ साली हुतात्मा मदनलाल धिंग्रा याने याच स्थळी केलेल्या कर्झन वायलीच्या वधाची आठवण झाली. हिंदुस्थानातील स्वार्थी व सत्तालोलुप पुढारी याचा निषेध करू लागले, चमचे लोकांनी निषेधाच्या सभा घेतल्या. गांधीजी नेहमी प्रमाणेच ‘माथेफिरू कृत्य’ असे विशेषण उपहासाने लावून मोकळे झाले. फक्त स्वा. सावरकरांनी प्रशंसा केली. जनता उधमसिंगांच्या या प्रतिशोधाने थक्क झाली व त्याच्या पुढे नतमस्तक झाली. तिकडे जर्मनीत मात्र या प्रतिशोधाची मुक्तकंठाने प्रशंसा झाली. मर्दाचा पोवाडा मर्दानी गावा. ‘बर्लिनेस बोरसेन सायटुंग’ या जर्मन वर्तमानपत्राने उधमसिंगांचे वर्णन *‘हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याचा तळपता दीप’* असे करीत अशी बातमी दिली की ‘पददलित हिंदुस्थानीयांच्या दबलेल्या संतापाचा हा आविष्कार आहे. आपल्या राज्यात हिंदुस्थानी प्रजा सुखात आहे असे सांगणार्‍या इंग्रजांना ही एक सणसणीत चपराक आहे.’ प्रसिद्ध अमेरिकन लेखक व पत्रकार विल्यम शिरर या प्रसंगी बर्लिन येथे होता. आपल्या ‘बर्लिन डायरी’ त त्याने १४ मार्च १९४० च्या पानावर लिहिले होते की " एक गांधी सोडले तर इतर बहुतेक हिंदुस्थानी लोक ओडवायरचा वध हा एक ईश्वरी प्रतिशोध आहे असेच मानतील.ओडवायर हेच अमृतसर हत्याकांडाचे उत्तरदायी आहेत. आज तमाम जर्मन वृत्तपत्रे असे म्हणत आहेत की ‘हिंदी स्वातंत्र्यवीराचे कृत्य ! अत्याचार्‍यांना गोळ्या घाला’".

      अभियोग चालून उधमसिंगांना अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना अंतिम भाषणात उधमसिंग म्हणाले "मी हे कृत्य केले कारण त्याची मरायचीच लायकी होती. तो माझ्या देशाचा गुन्हेगार होता. त्याने माझ्या देशबांधवांची अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न केला, मी त्यालाच चिरडून टाकले. मी गेली २१ वर्षे प्रतिशोधाच्या प्रतीक्षेत होतो, तो आता पूर्ण झाला आहे. मी मृत्यूच्या कल्पनेने जराही विचलित झालेलो नाही; मी माझ्या देशासाठी बलिदान करीत आहे. ब्रिटिशांच्या अत्याचारी राजवटीत मी अनेक देशबांधव मरताना पाहिले व त्याचा निषेध मी माझ्या कृत्याने व्यक्त केला. माझ्या मातृभूमीप्रीत्यर्थ मला मरण येत आहे याहून मोठा सन्मान कोणता?"

दि. ३१ जुलै १९४० रोजी उधमसिंग यांना लंडनच्या पेंटनवीले तुरुंगात, जिथे हुतात्मा मदनलाल धिंग्राला फाशी दिली होती तिथेच त्यांना फाशी दिली गेली. त्यांचा आदर्श असलेल्या भगतसिंगांप्रमाणेच त्यांचा मृतदेह ताब्यात न देता परस्पर त्याची विल्हेवाट लावली गेली. मात्र अनेक स्थानिक हिंदुस्थानी देशभक्त , भारत सरकार व पंजाब सरकार यांनी सातत्याने त्यांचे अवशेष हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला व प्रयत्नांना यश येऊन अखेर २० जुलै १९७४ रोजी ते अवशेष इथे आले. ते पवित्र अवशेष जालियनवाला बाग येथे एका व्यासपीठावर ठेवण्यात आले, व हजारोंनी त्याचे दर्शन घेतले व त्यावर पुष्पहार वाहिले. नंतर त्या पेटिकेची मिरवणूक चंदिगड, लुधियाना, जालंधर व त्यांचे जन्मगाव सुनाम येथे नेण्यात आली. अखेर लाखो लोकांच्या जयजयकारात त्यांच्या अस्थी आनंदपूर येथे गंगा व सतलज यांच्या संगमावर विसर्जित करण्यात आल्या.

तब्बल २१ वर्षे प्रतिशोधाचा ध्यास घेऊन अखेर तो पूर्णत्वास नेणार्‍या व त्यासाठी हसत बलिदान करणार्‍या ‘पंजाबशार्दुल हुतात्मा उधमसिंग’ यांना विनम्र अभिवादन!

🔹 उधमसिंग यांची राख एका कलशामध्ये जालियनवाला बाग येथे ठेवण्यात आलेली आहे.

🔸उधमसिंग यांना समर्पित एक संग्रहालय अमृतसरमध्ये जालियनवाला बाग जवळ आहे.

🔹उधमसिंग यांच्याजवळील शस्त्र, एक चाकू, त्याच्या डायरी, आणि शूटिंग एक बुलेट मध्ये  ब्लॅक संग्रहालय च्या स्कॉटलंड यार्ड मध्ये ठेवले आहेत.

🔸त्यांच्या मृत्यूच्या दिवशी पंजाब आणि हरियाणा मध्ये सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

🔹मार्च 2018 मध्ये अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे त्यांचा पुतळा बसविला गेला.


भास्करराव भोसले


 भास्करराव भोसले*
********************************
भास्करराव भोसले यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला तर २४ जुलै १९७८ हा स्मृतीदिन आहे .

आदरणीय भास्करराव भिकाजी भोसले हे आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते नि पुणे आकाशवाणी केंद्राचे १९६८-७३ दरम्यान संचालक होते. त्यामुळे बुद्ध वंदनेची रेकॉर्ड तयार करून घेण्याची जबाबदारी स्वत: बाबासाहेबांनीच भास्करराव भोसले यांच्यावर सोपवली होती. ९ ऑगस्ट १९५२ रोजी मा. कृष्णराव फुलंब्रीकर आणि बाबासाहेब यांची भास्करराव भोसले यांनी निवासस्थानी भेट घडवून आणली. पुढे नागपूरला धम्मदीक्षा सोहळ्यात ही रेकॉर्ड वाजवण्यात आली. 

भास्करराव भोसले यांचे वडिल पुणे शहराजवळच असलेल्या वाल्हे गावचे वतनदार, बलुतेदार आणि प्राथमिक शिक्षक होते. १९२३ पासून ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले. त्यामुळे भास्करराव यांना आंबेडकरी संस्काराचे बाळकडू घरच्या वातावरणातच मिळाले. पुणे येथील म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या अहिल्याश्रमाच्या मैदानात आंबेडकरी विचारांची अतिशय तरुण मुलांची एक फौज निर्माण झाली. अशा काळात भास्करराव यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

अहिल्याश्रमाच्या बोर्डिंग मध्ये भास्करराव दाखल झाले. तेव्हा शंकरराव खरात, बी.सी. कांबळे, एन.एम. कांबळे, डी.जी. जाधव, आर.आर. भोळे, पी.टी. बोराळे असे १९४० च्या आसपास उदयास आलेले नेतृत्वगुण संपन्न विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. १९३७ ची सार्वत्रिक निवडणूक भारताच्या इतिहासातली आधुनिक काळातील पहिली सांसदीय स्वरूपाची निवडणूक होती. भास्करराव एस.पी. कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते. एस.पी. कॉलेज गुणवत्तेसाठी प्रसिद्ध होते.

पुण्याचे नेतृत्व गांधी प्रणित काँग्रेसकडे सरकले होते. पण पुण्याच्या बौद्धिक वातावरणात धाक होता तो याच टिळकयुगातून पुढे आलेल्या ब्राह्मणी अस्मितेचा. अशा वातावरणात या तरुण आंबेडकरी विचाराच्या युवकांना सामना करावा लागत होता तो सनातनी अस्मितेशी. हा सामना करायचा तर वाचन, अभ्यास, वक्तृत्व आणि लेखन या क्षेत्रात आपल्या तेजाने प्रकट व्हायला हवे अशी एक महत्वकांक्षा या तरुण मंडळीत निर्माण झालेली होती. बाबासाहेबांसारखा बौद्धिक क्षेत्रात दरारा असणारा पहाड पाठीशी उभा होता. त्यामुळे या तरुणांत बौद्धिक आत्ममग्नता निर्माण झाली होती. त्यासाठी वाचन आणि अभ्यास क्षेत्रात मेहनत करणारी नवशिक्षित दलितांची नवी पिढी होती. आपल्या अध्यापकाचा वावटुक पद्धतीने अपमान न करता तेवढ्याच बौद्धिक सामर्थ्याने युक्तीवादाची शस्त्रे हाती घेऊन लढायला सिद्ध झालेल्या तरुण मुलांत भास्करराव भोसले हा तरुण होता.

स्वातंत्र्यसैनिक अरुणा_असफ_अली



स्वातंत्र्यसैनिक #अरुणा_असफ_अली (#पूर्वाश्रमीच्या_अरूणा_गांगुली) (16 जुलै 1909 - 29 जुलै 1996) ह्या शिक्षिका, राजकीय कार्यकर्ती आणि प्रकाशक, दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या. 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी गोवालिया टँक, मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावल्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागाबद्दल आणि दाखविलेल्या हिंमतीबद्दल नेहमीच त्यांचे स्मरण केले जाते. स्वातंत्र्यानंतर त्या राजकारणात सक्रिय राहिल्या, दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या.

पदवी शिक्षणानंतर त्यांनी कलकत्ता येथील गोखले मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. अलाहाबादमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते असफ अली यांच्याशी भेट झाली. धर्म आणि वयाच्या कारणास्तव (वयात 20 वर्ष अंतर) पालकांचा विरोध असूनही त्यांनी 1928 मध्ये लग्न केले. मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली. 1932 मध्ये त्यांना तिहार तुरुंगात असताना तेथे उपोषण करून राजकीय कैद्यांबाबतीत उदासीन धोरणाचा त्यांनी निषेध केला होता. त्या प्रयत्नांमुळे तिहार कारागृहात परिस्थिती सुधारली. सुटकेनंतर त्या राजकीयदृष्ट्या फारशा सक्रिय नव्हत्या.

परंतु 1942 च्या शेवटी त्यांनी भूमिगत चळवळीत भाग घेतला. प्रमुख कार्यकारी नेते आणि काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना अटक करून सरकारने प्रत्युत्तर दिले आणि अशाप्रकारे आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. तरुण अरुणा या 9 ऑगस्ट रोजी उर्वरित अधिवेशनाच्या अध्यक्ष झाल्या आणि गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकविला. आणि यामुळेच 1942 चे आंदोलन पुन्हा जोमाने  सुरू होण्यास कारणीभूत झाले. अधिवेशनात पोलिसांनी जमावावर गोळीबार केला.

अरुणा यांना तेव्हापासून चळवळीची नायिका म्हणून ओळखले जाऊ लागले आणि नंतरच्या काळात त्यांना स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी म्हटले गेले. मोठे नेते तुरूंगात असल्याने थेट नेतृत्व नसतानाही, स्वातंत्र्य मिळविण्याच्या भारताच्या तरुणांच्या इच्छेचे अभिव्यक्ती म्हणून देशभर उत्स्फूर्त निदर्शने आणि प्रदर्शने करण्यात आली. अरूणा या अटक टाळण्यासाठी भूमिगत झाल्या आणि 1942 साली भूमिगत चळवळ सुरू केली.

#त्यांची_मालमत्ता_जप्त_करुन_विक्री_केली_गेली. दरम्यान राम मनोहर लोहिया यांच्यासमवेत त्यांनी काँग्रेस पक्षाचे मासिक इन्किलाबचे संपादन केले. 1944 च्या एका अंकात त्यांनी तरुणांना हिंसाचार आणि अहिंसेविषयी व्यर्थ चर्चा विसरून क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी कृती करण्यास सांगितले. जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांच्यासारख्या नेत्यांना "गांधींचे राजकीय अपत्य, पण कार्ल मार्क्सचे अलीकडील विद्यार्थी" असे वर्णन केले गेले. त्यांना पकडण्यासाठी सरकारने पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

स्वातंत्र्यानंतर त्या काँग्रेस सोशलिस्ट पक्ष, 1948 मध्ये 'सोशलिस्ट पार्टी', भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. परंतु 1956 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. दिल्लीच्या पहिल्या महापौरपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण सक्रिय राजकारणामध्ये भाग घेणे बंद केले. आणीबाणीबाबत मतभेद असूनही, त्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जवळच्या  राहिल्या.

अरुणा असफ अली यांना 1964 चा आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार व 1991 मध्ये जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय ऐक्य पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1997 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर देण्यात आला. 1998 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट जारी करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीतील अरुणा असफ अली मार्गाचे नाव देण्यात आले. ऑल इंडिया मायनॉरिटीज फ्रंटतर्फे डॉ अरुणा असफ अली सद्भावना पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 29 जुलै 1996 रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले.  
 विनम्र अभिवादन 


मुथुलक्ष्मी रेड्डी


*सुधारक डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी *
********************************

जन्म - ३० जुलै १८८६
स्मृती - २२ जुलै १९६८ (चेन्नई)

शिक्षक, सर्जन आणि समाज सुधारक डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म ३० जुलै १८८६ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील पुडुकोट्टाई संस्थानात झाला.

मुथुलक्ष्मी रेड्डी या भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्या म्हणजे आमदार होत्या. त्यांचे वडील नारायण स्वामी हे चेन्नईच्या महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. तो केवळ पुरुषांनीच शिक्षण घ्यायचा काळ. महिलांचे जीवन केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित. अशा परिस्थितीत मुथूलक्ष्मींनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणाची आवड आणि बंडखोर स्वभावामुळे पुढचे शिक्षण घ्यायचे ठरले. त्यांची आई त्यांच्या या निर्णयाच्या मागे ठामपणे उभी राहिली. मुथूलक्ष्मीनी चेन्नईच्या महाराजा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथून पदवी घेतल्या नंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर त्या मद्रासच्या शासकीय मातृत्व व नेत्र रुग्णालयात महिला सर्जन (शल्यविशारद) म्हणून रुजू झाल्या. 

डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांनी स्थापन केलेल्या 'वुमेन्स इंडिया असोसिएशन' तर्फे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९२६ साली त्या मद्रास विधिमंडळाच्या सदस्या बनल्या. अशा रितीने विधिमंडळाच्या सदस्या बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. जगातील कोणत्याही विधिमंडळाच्या पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले. 

डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांचे २२ जुलै १९६८ रोजी निधन झाले

स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ Gobindbhai shraf


*स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ*
********************************
गोविंदभाई श्रॉफ यांचा
जन्मदिन २४ जुलै १९११ आहे . तर
 २१ नोव्हेंबर २००२ हा स्मृतीदिन आहे .

गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक. निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थांन मुक्त व्हावं म्हणून गोविंदभाई श्रॉफ यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सोबत काम केलं. त्यानंतर मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला. 

मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न गोविंदभाईंनी लावून धरला. सरस्वती भूवन या आता शंभर पार केलेल्या शिक्षण संस्थेची स्थापना केली. कधीकाळी या संस्थेच्या ऑफीसातूनच मराठवाड्याच्या विकासाची, आंदोलनाची दिशा ठरवली जायची. 

स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातले, मराठवाड्याशी संबंधित सगळे राजकारणी, समाजकारणी वेगवेगळ्या प्रश्नांवर गोविंदभाईंचा सल्ला घ्यायला यायचे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्याच्या अनुशेषाचा मुद्दा लावून धरला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले. 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाला त्यांनी केलेला विरोध वादग्रस्त ठरला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार दिला जातो.

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद chandrashekhar azad



*क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद*
********************************
स्वातंत्र्याचे महानवीर चंद्रशेखर आझाद यांचा
जन्म २३ जुलै १९०६ रोजीचा (मध्यप्रदेश)
 २७ फेब्रुवारी १९३१ (अलाहाबाद) हा त्यांचा स्मृतीदिन आहे .

ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात मात्र विलीन झाले.

आपल्या भारतावर सुमारे १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. स्वराज्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अनेकांनी अनेक विविध मार्ग अवलंबिले. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी कसे लढले याचे धडे आपल्याला लहानपणापासूनच दिले जातात. त्यांच्याशी निगडित अनेक किस्से, गोष्टी आपण ऐकत असतो.

असाच एक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी स्वतःचे प्राण त्यागून अजरामर झाला. व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातावर घड्याळ, पिळदार आणि टोकेरी मिश्या आणि एका हाताने त्या मिश्याना पीळ देणारा फोटो आपण पाहिला कि आपल्या ओठांवर लगेच नाव येते आझाद ! चंद्रशेखर आझाद ! जहाल मतवादी आझाद हे आजही सर्वांना प्रेरणा देऊन जातात. आज याच आझादांच्या आझाद अशा आयुष्यावर हा लेख.

*कसे झाले तिवारी ते आझाद ?*

२३ जुलै १९०६ मध्ये, मध्य प्रदेश मधील भाबरा या गावात सीताराम तिवारी आणि जागरानी देवी तिवारी यांच्या पोटी मुलगा जन्माला आला, मुलाचे नाव ठेवले चंद्रशेखर. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि मल्लखांब सारख्या खेळांत प्रवीण होते. या छोट्याश्या गावात चंद्रशेखर यांना स्वतःचे अस्तित्व सापडत नव्हते. वयाच्या १३/१४ व्या वर्षी आपल्या गावात येणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत चंद्रशेखर आपला रस्ता बनवत निघाले मुंबई कडे. मुंबई मध्ये आले, काही काळ जहाजावर काम देखील केले, मग संस्कृत शिक्षणासाठी ते गेले बनारस येथे.

मुंबई, बनारस यांसारखी मोठी शहरे त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्रे होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखाच्या गर्तेत होता. या आंदोलनांची माहिती सर्वांसारखीच चंद्रशेखर या १५ वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्याने मात्र फक्त या बातम्या ऐकल्या नाहीत, त्याने या बातम्यांचा एक भाग होण्याचे ठरविले आणि या १५ वर्षाच्या मुलाने महात्मा गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता, पोलिसांनी अनेक मुलांना अटक केली आणि यात चंद्रशेखर यांना सुद्धा अटक केली गेली.

त्यांच्यावर कोर्टात खटला चालू झाला, याच खटल्यात त्यांना पेश करताच त्यांना नाव विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, "मी चंद्रशेखर आझाद" आणि बस्स त्या दिवसापासून चंद्रशेखर तिवारी यांना सगळे चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले.

*जहाल मतवादी प्रवास*

असहकार आंदोलनातील खटल्यामध्ये शिक्षा भोगून आझाद बाहेर पडले परंतु देशासाठी आता आक्रमक वृत्तीने आपल्याला पेटून उठले पाहिजे आणि इंग्रजांना जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे या विचाराने आझाद स्वस्थ बसू शकत नव्हते. गांधीजींनी लोकांच्या हिंसक पद्धतींमुळे असहकार आंदोलन स्थगित केले आणि मग आझाद यांना आपला मार्ग बदलावासा वाटला. फक्त अहिंसेने क्रांती येणार नाही तर त्याला हिंसेची सुद्धा जोड हवी म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी जहाल मतवाद्यांचा मार्ग स्वीकारला आणि आझाद यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या आझादीकडे पाऊले टाकली.

या प्रवासात ते अनेकांना भेटले आणि यातूनच ते जोडले गेले हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेसोबत. ते मनापासून या संघटनेचा भाग झाले आणि संघटनेसाठी प्रचार करीत असत. या संघटना चालवायच्या म्हणजे पैसे हवेत आणि पैसे मिळवण्यासाठी आझाद या संघटनेसोबत मिळून अनेक सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकायचे. या इंग्रज सरकारने भारताला बरेच लुटले, आता वेळ होती आपण त्यांना लुटण्याची. या छोट्या मोठ्या चोऱ्या आणि लूटमार करून आझाद स्वस्थ नव्हते, त्यांच्या भक्कम शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, पडेल ते काम करायची हिम्मत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे ते लवकरच संघटनेचा एक उत्तम, विश्वासू चेहरा आणि पुढारी बनले.

*काकोरी आणि बरंच काही :*

नियमित अभ्यास, कसरत, बंदुकीसारख्या शस्त्रांचा सराव यामुळे आझाद आता अतिशय तरबेज झाले होते. अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आता एक मोठा झटका देणे त्यांच्या मनात आले. यातूनच त्यांना युक्ती सुचली काकोरी लूटमारीची. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे इंग्रजांच्या खजिन्याची मालगाडी जात असताना अचानक त्या मालगाडीवर हल्ला करून मोठी धनसंपत्ती या क्रांतिकारकांनी गोळा केली.

या घटनेने इंग्रजांना चांगलेच हादरवून सोडले. त्यांनी आरोपींवर ताबडतोब खटले चालविले आणि या काळात आझाद आपला वेष बदलून अज्ञातवासात आपले कार्य करीत होते. या आरोपींमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष बिस्मिल आणि त्यांच्यासोबत संघटनेचे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी सामील होते आणि या सर्वाना फाशीची शिक्षा सुनावली गेली.

संघटनेचा मुख्य आधार गेल्यावर संघटना विखुरली गेली. आझाद यांच्या खूप प्रयत्नांनंतरही काही झाले नाही. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. कालांतराने त्यांची ओळख भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू अशा क्रांतिकारकांशी झाली आणि मग आझाद यांना बळ आले. त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि अजून काही साथीदारांसोबत मिळून पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करायचे ठरविले आणि अखेर सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आता या संघटनेचे आझाद हे प्रमुख होते आणि या संघटनेमध्ये भगत सिंग आणि त्यांचे साथीदार अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.

या नंतर या संघटनेमार्फत बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा जमा करणे आणि अशी अनेक क्रांतिकारी कामे केली जात होती. अशातच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता आझाद पुन्हा एकटे, तरीही हार न मानता त्यांनी या तिघांना सोडविण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तरीही आपल्या क्रांतिकारी कामांमध्ये आझाद यांनी खंड पडू दिला नाही. आता तर ते अजून आक्रमक झाले आणि १९२९ मध्ये त्यांनी चक्क दिल्ली जवळील व्हाइसरॉयची अक्खी रेल्वे गाडी बॉम्ब लावून नेस्तनाबूत केली. आता मात्र इंग्रज अजूनच दचकले आणि आझाद यांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न अजून जोरात चालू झाले. अनेक प्रयत्नांनंतरही इंग्रज आझाद यांना पकडू शकत नव्हते.

*आहे आझाद नि राहीन आझाद :*

आपल्या संघटनेची सुटत चाललेली एकता, अनेक क्रांतीकारकांना खटल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न, संघटनेसाठी धन गोळा करण्याचे विविध मार्ग या साऱ्यांचा विचार आझाद यांच्या मनात घर करून होता. त्यांचे अनेक साथीदार त्यांच्या विरुद्ध झाले होते याची देखील त्यांना खबर लागली नव्हती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील अल्फ्रेड उद्यानात आझाद आपला साथी सुखदेव (फाशी गेलेला सुखदेव नाही) याच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत होते आणि अनेक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते.

अशातच त्यांचा एक जुना साथीदार वीरभद्र तिवारी याने त्या भागातील पोलीसांना बातमी दिली कि तुम्ही ज्या आझादला शोधून दमला आहात तोच आझाद सध्या अल्फ्रेड उद्यानात तुम्हाला सापडेल. ताबडतोब इंग्रज अधिकारी आपल्यासोबत मोठी फौज घेऊन उद्यानाकडे रवाना झाले. या प्रकारची खबर आझाद यांना मुळीच नव्हती.

अनेक विषयांवर चर्चा करत ते सुखदेव सोबत एका झाडाच्या सावलीत बसलेले होते. अचानक एकाएकी अक्खे उद्यान इंग्रजांनी काबीज केले आणि आझाद यांना शरण येण्याची आज्ञा करण्यात आली, केलेली आज्ञा धुडकावून आझाद यांनी आपली पिस्तूल काढली आणि ते इंग्रजांवर गोळीबार करू लागले. यातच इंग्रजाची गोळी थेट आझाद यांच्या मांडीवर येऊन लागली. यातनांना कुरवाळत बसायला वेळ नव्हता, सगळं कठीण होऊन बसलं होतं.

पिस्तूल छोटी, त्यात गोळ्या सुद्धा मोजक्या आणि समोर अक्खी पोलीस फौज आणि मागे अनेक जबाबदाऱ्या आणि या साऱ्याच्या पलीकडे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. काय करावे काही सुचेना. त्यांनी सुखदेव याला सुखरूप पळण्यास वाट दिली आणि पुढील देशकार्य चालू ठेवण्यास सांगितले.

इंग्रजांच्या गोळीबाराला आझाद उत्तर तर देत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलून गेली. आझाद एकटे आणि मोजक्या बंदुकीच्या गोळ्या. याउलट इंग्रजांची फौज आणि अमाप गोळ्या. कसा मुकाबला व्हावा ?

लढता लढता शेवटची एक गोळी शिल्लक राहिली. काय करावे ? इतरांसारखे इंग्रजांना शरण जावे आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यावर फाशी जावे ? त्यांचा विजय होऊ द्यावा कि आझाद हे नाव सार्थ करावे ?

आझाद यांनी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली होती तेव्हाच ठरविले होते कि आझादला या पुढे कोणताही पोलीस हात लावू शकणार नाही आणि कोणतेही कारागृह बंद करून ठेऊ शकणार नाही आणि इंग्रजांच्या बेड्या कधीही माझ्या हाताची कार्यक्षमता जखडु शकणार नाहीत. आपला हा निश्चय टिकविणे त्यांना जास्त योग्य वाटले. त्यांनी मन घट्ट केले, शेवटची एक गोळी पिस्तुलात टाकली. भारतमातेला आठवून तीच पिस्तूल आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वतःला संपविले.

इंग्रज आले पण आझाद नाही तर आझादांचा मृतदेह त्यांच्या हाती आला. आझाद यांनी आपले नाव सार्थ केले. ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात विलीन झाले.

ते आझाद होते नि आझाद म्हणूनच राहिले !

प्रणाम या भारतमातेच्या थोर पुत्राला !

*स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल


*जरा याद करो कुर्बानी* 🇮🇳🇮🇳 !
(स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त )


*स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल*
********************************
स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल यांचा
जन्मदिन २४ ऑक्टोबर १९१४ (चेन्नई) आणि
स्मृतीदिन २३ जुलै २०१२रोजीचा

कॅप्टन लक्ष्मी सेहगल या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी.
लक्ष्मी सेहगल यांचा जन्म एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लक्ष्मी सेहगल यांचे वडील डॉ.एस. स्वामीनाथन हे प्रख्यात वकील होते, तर आई अमू स्वामीनाथन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 

लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्या सेहगल यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या. डॉक्टरकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४० मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपर्कात त्या आल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महिलांसाठी ‘राणी झाशी रेजिमेंट’ ची स्थापना केली. लक्ष्मी सेहगल यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. सेहगल यांनी कर्नल पदापर्यंत बढती मिळविली पण त्यांची ‘कॅप्टन’ ही ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. स्वातंत्र्यसमरात आणि नंतर समाजकारणात मोठे योगदान देणार्या या कर्तृत्वशाली वीरांगनेने जगासमोर स्वत: चा आदर्श निर्माण केला.

दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानी सेनानी सिंगापूर मध्ये ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला तेव्हा लक्ष्मी सेहगल सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाल्या. १९४३ साली आझाद हिंद सरकारच्या कॅबिनेट मध्ये पहिली महिला सदस्या होण्याचा मान त्यांनी पटकाविला. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट मध्ये लक्ष्मी सेहगल या नेहमीच सक्रिय राहिल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कर्नल हे पद देण्यात आले. 

१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले व हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. स्वातंत्रोत्तर काळानंतर त्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षात प्रवेश करून आपले कार्य राज्यसभेत चालूच ठेवले.

बांगलादेश फाळणी अन भोपाळ गॅस दुर्घटने वेळी स्वतः वैद्यकीय सेवा केली. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले. लक्ष्मी सेहगल यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक


*शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक*

डॉ. चित्रा नाईक यांचा


जन्मदिन १५ जुलै १९१८ (पुणे) आहे तर

स्मृतीदिन आहे  २४ डिसेंबर २०१० (पुणे)


शिक्षणतज्ज्ञ, माजी शिक्षण संचालिका म्हणून डॉ. चित्रा नाईक प्रसिद्ध आहेत .


चित्रा नाईक यांचे  माहेरचे आडनाव योगायोगाने नाईकच. त्यांचे वडील मुंबई मध्ये नामांकित डॉक्टर होते. लाडात वाढलेल्या चित्रा नाईक लहानपणी शाळेत जायला नाखूष असत, पण त्यांच्या आईने त्यांचा शिक्षणाचा आरंभ स्वत: करून दिला. त्यांनी ओळखले की, मुलीला नेमलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यात रूची नाही. पण अन्य वाचनाची आवड खूप आहे. म्हणून त्यांनी मुलीच्या  वाचनाची भूक भागेल यासाठी भरपूर व्यवस्था केली. त्यातून चित्रा नाईक यांचे मानसिक जग खूप विस्तारले. थोडेसे लेखन होऊ लागले. वक्तृत्व सभा मध्ये भाग घेणे घडू लागले.


१९४० च्या सुमारास त्यांच्या सारखा विद्यार्थी वर्ग देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिंता करण्यात गढला होता. चित्रा नाईकही सत्याग्रह, मार्क्सवाद, समाजवाद अशा विषयाच्या चर्चेत दंग होत. पत्रकारितेचे सुद्धा त्यांना आकर्षण होते. इंग्रजी ऑनर्स घेऊन त्या बीए झाल्या आणि बीटी च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह पहिला वर्ग मिळविला. मुंबईच्या सरकारी शिक्षणशास्त्र विद्यालयात त्यांना साहाय्यक व्याख्यात्याची जागा मिळाली. नंतर पीएचडी साठी संशोधन सुरू केले. तेथील मार्गदर्शक प्रा. रामभाऊ परूळेकर व त्यांचे स्नेही जे.पी. नाईक यांनी चित्राताईंना भरपूर वैचारिक खाद्य पुरविले. 


डॉक्टरेट केल्यावर त्यांना सरकार मध्ये शिक्षण अधिकाऱ्याचे पद मिळाले. त्यावेळी त्या ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ एज्युकेशन’ हे त्रैमासिक संपादित करीत असत. १९५० मध्ये त्यांना ब्रिटन मधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली व त्या इंग्लंडला गेल्या. तेथून परत आल्यावर त्यांची मुंबई सरकारच्या शिक्षण सेवेत ‘सहाय्यक शैक्षणिक तपासणी अधिकारी’ या जागेवर नेमणूक झाली. ते काम करीत असतानाच १९५३ मध्ये त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांचा नाईकांच्या मौनी विद्यापीठाशी संबंध आला होता. त्यामुळे त्यांनी अभ्यासासाठी ‘ग्रामीण शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन’ हा विषय निवडला.


शिष्यवृत्तीचा एक वर्षाचा काळ संपल्यावर सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे जाण्यापूर्वी कोल्हापूरला जे.पी. नाईक व त्यांचे सहकारी यांच्याशी त्यांची चार दिवस चर्चा झाली. तेव्हा त्यांनी गारगोटीच्या ग्रामीण विद्यापीठाची संपूर्ण माहिती घेतली. नंतरही सुटीच्या दिवसात त्या अनेकदा कोल्हापूरला जात. त्यावेळी नाईकांच्या मित्रमंडळींनी त्या दोघांना विवाह करण्याचा आग्रह केला आणि त्याप्रमाणे १९५५ मध्ये त्यांनी विवाह बंधन स्वीकारले. नंतर त्यांना कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक ही मिळाली आणि कोरगावकरांच्या वाड्यात चार खोल्या मध्ये त्यांचा संसार सुरू झाला. तो पर्यंत मौनी विद्यापीठाला अखिल भारतीय मान्यता मिळाली होती. मात्र प्रा. परुळेकर निवृत्त झाल्याने कोरगावकर संशोधन संस्थेच्या संचालकांची जागा रिकामी झाली होती. तिथे चित्रा नाईक यांना प्रतिनियुक्तीवर घेण्याचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आणि १९५७ मध्ये ३ वर्षांच्या करारावर त्या गारगोटीला गेल्या. मात्र १९५९ मध्ये नाईकांना शिक्षण मंत्रालयाने दिल्लीला प्राथमिक शिक्षण सल्लागार म्हणून निमंत्रित केले व तेथून पुढे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्य वाढतच गेले.


जून १९६१ मध्ये चित्रा नाईक कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राचार्यपदी परत गेल्या. १९६२-६३ च्या दरम्यान त्यांना भारत सरकारच्या मूलोद्योग शिक्षण संस्थेत संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर नेमणूक मिळाली. परंतु १९६४ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने परत बोलविले. १९६९-७० मध्ये त्या पुन्हा प्रतिनियुक्तीवर दिल्लीला गेल्या. पण नंतरच्याच वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होऊन त्या पुण्यात परत आल्या. १९७८ ते ८० ताईंना प्रौढ शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी व्हिएतनाम, बँकॉक, रशिया वगैरे देशातून प्रवास करावा लागला.


जे.पी. नाईकांचे कर्करोगाने ३० ऑगस्ट १९८१ रोजी निधन झाले. त्यानंतर सर्वांसाठी शिक्षण मुक्त व्हावे म्हणून इन्स्टिट्यूट मध्ये अनौपचारिक शिक्षण संशोधन केंद्र १९७८ मध्ये सुरू करण्यात आले व त्याला त्यांनी वाहून घेतले. या केंद्राच्या मानद संचालिका म्हणून काम करीत असताना त्यांनी नव-साक्षरांसाठी ‘पसाय’ मासिक काढले, ४५ कथा पुस्तिका लिहिल्या, देशोदेशीचे प्रौढ शिक्षणतज्ज्ञ निमंत्रित करून नव्या अभ्यासक्रमाचे आराखडे तयार केले. इतर देशातील प्रौढ शिक्षणाची पाहणी करण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. 


भारत सरकार व अन्य संस्थांनी त्यांना प्रौढ शिक्षण आंदोलनासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले. याच सुमारास इंडियन इन्स्टिट्यूटला भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेने मान्यता दिली. जे.पी नाईकांच्या पश्चात इन्स्टिट्यूटची देखभाल चित्रा नाईक यांनीच केली व तिचा सर्व बाजूंनी विस्तार केला. ती संस्था पुण्यात कोथरुड मध्ये आहे.


शाळा सोडलेल्या मुलामुलींसाठी अनौपचारिक शिक्षणाचा कृती संशोधन प्रकल्प चित्रा नाईक यांनीच १९७९ मध्ये सुरू केला. त्यात सुमारे ८००० विद्यार्थ्यांसाठी २२८ खेड्यापाड्यात वर्ग उघडले व प्राथमिक शिक्षण प्रसाराला नवी दिशा दिली. १९८२ मध्ये चित्रा नाईक यांना अफगाणिस्थानातील स्त्रियांचे प्रौढ शिक्षण व प्राथमिक शिक्षण यासाठी सल्लागार म्हणून निमंत्रण आले. १९८४ मध्ये ‘तुलनात्मक शिक्षण’ या विषयावर पॅरिस येथील जागतिक परिषदेत आणि फ्रँकफर्ट विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. शैक्षणिक योजनेवर निबंध वाचण्यासाठी १९८८ मध्ये त्यांना रशियाला जावे लागले. त्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियोजन मंडळाचे सदस्यत्व मिळाले तर १९९१ मध्ये भारताच्या योजना आयोगाचे.  तीन राजकीय पक्षांच्या प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ते कार्य सांभाळून १९९८ मध्ये त्या पुण्यास परतल्या. तत्पूर्वी १९९४ मध्ये ग्रामीण स्त्रियांचे शिक्षण व सबलीकरण होण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवापूर येथे ‘ग्रामीण महिला विकासिनी’ या केंद्राची स्थापना केली होती. त्या कामाकडे नंतर त्यांनी अधिक लक्ष पुरविले. संस्थेचे ‘शिक्षण आणि समाज’ हे त्रैमासिक त्या १९७८ पासून संपादित करीत आहेत. 


जागतिकीकरणाच्या वास्तवाला भारतीय शिक्षण क्षेत्र कोणत्या प्रकारे सामोरे जाऊ शकेल याचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. त्यांच्या अलौकिक कार्याला देखील सार्वत्रिक मान्यता मिळाली. त्यांना युनेस्कोने आंतरराष्ट्रीय जॅन कमेनियस पारितोषिक १९९३ मध्ये प्रदान केले. त्याशिवाय त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार, टागोर पुरस्कार, प्रणवानंद पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदागौरव पुरस्कार प्राप्त  झाला आहे. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे. 



क्रांतिकारक नागनाथ आण्णा

 येत्या १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे अर्थात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्ष असणार आहे. ज्या विचारधारेचा, राजकारणाचा नरेंद्र मोदी यांना अभिमान आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता, याचीदेखील नाेंद करायला हवी. याची चर्चा आता होत राहणार. टीकाटिप्पणी होत राहणार याविषयी वाद नाही. मात्र, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रीय चळवळीने मध्यवर्ती भूमिका बजावली होती हे कोणी नाकारू शकत नाही. इतिहास या विषयाची एक बाजू चांगली असते की, त्यात कोणालाही बदल करता येत नाही. त्याचे विश्लेषण विविध प्रकारे करता येईल. सोयीनुसारही अर्थ काढण्यास संधी मिळेल. मात्र, महात्मा गांधी यांनी अखेरच्या टप्प्यात साऱ्या देशाला स्वातंत्र्यलढ्यात उतरविले हे अमान्य करू शकत नाही.


काँग्रेसशिवायदेखील अनेक गट-तट, संघटना, चळवळी, क्रांतिकारी सेना उभारून ब्रिटिश साम्राज्याला धक्का देण्याचे ऐतिहासिक काम करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र लढा देणारी आझाद हिंद सेना होती. अनेक ठिकाणी छोटे-मोठे गट क्रांतिकारकांच्या सहभागाने इतिहास घडवीत होते. सुभाषचंद्र बोस यांची जडणघडण काँग्रेस पक्षातच झाली होती. स्वातंत्र्याची कल्पना-संकल्पनादेखील काँग्रेसच्या विचारधारेनुसारच होती. लढा देताना हिंसेचा मार्ग स्वीकारायचा की, अहिंसेचा यावर तीव्र मतभेद होते. त्यांनी हिंसेचा मार्ग निवडून भारताला आझाद करण्यासाठी सशस्त्र लढा देणारी सेना उभारली. तीच आझाद हिंद सेना म्हणून नावारूपाला आली.


देशाच्या काेनाकोपऱ्यांत अनेक गट तयार झाले होते. महात्मा गांधी यांचा विचार शिरसावंद्य मानूनही हिंसेच्या मार्गाने लढा देणारे काही गट होते. त्यापैकीच एक सातारचे प्रतिसरकार स्थापन करणारा क्रांतिकारकांचा गट होता. नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा इव्हेंट करायचा असेल; मात्र काँग्रेससह देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांचे स्मरण नको आहे. सातारचे प्रतिसरकार हा आझाद हिंद सेनेसारखाच लढा देणारा मोठा गट क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथआण्णा, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, आदींच्या नेतृत्वाखाली लढत होता. तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील (आताच्या सांगली जिल्ह्यात) कामेरी येथे ३ जून १९४३ रोजी पहिली बैठक झाली होती. ३ जून २०१८ रोजी या प्रसंगाला पंचाहत्तर वर्षे झाली होती. तेव्हा सातारच्या प्रतिसरकारचे कोणालाही स्मरण देखील झाले नाही. आपल्या देशात सहा ठिकाणी क्रांतिकारकांनी प्रतिसरकार स्थापन करून त्या परिसरातून ब्रिटिशांचे शासन उखडून टाकले होते. त्याविरुद्ध अतिशय कठोर कारवाई ब्रिटिशांनी केली आहे. सहापैकी तीन प्रतिसरकारे तातडीने मोडून काढली. महाराष्ट्रातील सातारा, उत्तर प्रदेशातील बलिया आणि पश्चिम बंगालमधील मिदनापूरचे प्रतिसरकार मोडून काढण्यास अवधी लागला. सातारचे प्रतिसरकार एकमेव असे होते की साडेतीन वर्षांनी स्वातंत्र्याची पहाट दिसू लागल्यावर क्रांतिकारकांनी शस्त्रे खाली ठेवली म्हणून ते संपुष्टात आले.


अशा या ऐतिहासिक सातारच्या प्रतिसरकारचा अमृत महोत्सव २०१८ मध्ये आला आणि कोणाच्याही स्मरणात न राहता काळाच्या पडद्याआड निघून गेला. या प्रतिसरकारच्या आघाडीवरचे नेते क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी! त्यांचे जन्म शताब्दी वर्ष उद्याच्या १५ जुलैला आहे. सांगली जिल्ह्यातून संथपणे वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या वाळवा गावी आण्णांचा जन्म नायकवडी या शेतकरी कुटुंबात झाला. (१५ जुलै १९२२). आण्णांचे नव्वद वर्षांच्या आयुष्याचे दोन भाग प्रामुख्याने करता येतील. वयाच्या विसाव्या वर्षात घरच्यांना न सांगता कोल्हापुरात प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमधील घेत असलेले शिक्षण अर्धवट सोडून ९ ऑगस्ट १९४२ च्या मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात हजेरी लावली. महात्मा गांधी यांच्या ‌'करो या मरो' या घोषणेने प्रभावित होऊन परतलेल्या युवकांमध्ये नागनाथआण्णा होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना हैराण करून सोडायचा निर्धार केला. यासाठी शस्त्रे हवीत. शस्त्रांसाठी पैसा हवा. पैशांसाठी सरकारी कचेऱ्या लुटायच्या. ट्रेझरीवर हल्ले करायचे. टपालाने जाणाऱ्या मनिऑर्डरचा खजिना लुटायचा. त्यासाठी रेल्वे थांबवून लुटायच्या. अशा कारवाया सुरू केल्या. स्वातंत्र्य लढ्यातील नागनाथआण्णांची ही पहिली भूमिका आहे. पैसा आणि शस्त्रे मिळाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण आवश्यक होते. त्यासाठी याच नागनाथ या युवकाने दिल्ली गाठली.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेना म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात प्रवेश करून ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारण्यास येणार होती. आझाद हिंद सेनेवर कारवाई करण्यासाठी दिल्लीहून शीख रेजिमेंटची बटालियन पाठविली होती. त्या बटालियनच्या जवानांचे कोलकत्याला पोहोचण्यापर्यंत मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेविरुद्ध लढण्यास नकार देऊन बंड केले. (याला खरे बंड म्हणतात.) या सर्व जवानांची धरपकड झाली. दिल्लीला आणून कोर्टमार्शल सुरू झाले. यापैकी काही जवानांना आणून प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांना प्रशिक्षण देता येईल या कल्पनेने नागनाथ हा तरुण एकटाच दिल्लीला गेला. त्यापैकी नानकसिंग आणि मिसासिंग यांना गाठून घेऊनच आले. लुधियाना जिल्ह्यातील या जवानांनी चांदोलीच्या जंगलात प्रतिसरकारसाठी जमलेल्या सुमारे चारशे युवकांना शस्त्रे चालविणे, दारूगोळा बनविणे, तो उडविण्याचे प्रशिक्षण देत होते. त्या प्रशिक्षण शिबिरावर सातारा पोलिसांनी छापा टाकला. तो दिवस होता २५ फेब्रुवारी १९४५! गोळीबार झाला. नागनाथआण्णांसह अनेक युवक अंधारात चकवा देऊन पळाले. मात्र, पंजाबचे नानकसिंग आणि वाळव्याचे किसन अहिर मृत्युमुखी पडले.


कोठे पंजाब, कोठे वारणेचे खोरे! साताराचे प्रतिसरकार स्थापन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेले नानकसिंग यांच्या पार्थिवावर त्याच रात्री सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रांतिकारक प्रसंग सारे विसरले. महाराष्ट्र आणि पंजाबनेही नानकसिंह यांची दोन बंडे विसरली. लुधियाना जिल्ह्यात जन्म आणि वारणा काठच्या सोनवडे येथे मृत्यू! कशासाठी तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी! महाराष्ट्राच्या इतिहासात याची नोंद असती तर २०१८ मध्ये अमृत महोत्सव साजरा झाला असता. पंजाबचे मुख्यमंत्री सुखवीरसिंग मान यांना तरी या इतिहासाची ओळख असेल का? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर नागनाथअण्णांसह अनेक क्रांतिकारकांनी हा लढा निकराने दिला. तुरुंगवास घडला; पण तो तुरुंग फोडून पसार होण्याचे धाडसही या क्रांतिकारी युवकांनी दाखविले. नागनाथ नायकवडी यांनी साताराच्या मध्यवर्ती तुरुंगाची पोलादी चौकट तोडून पलायन केले. (आता स्वतंत्र भारताचे आमदार पलायन करतात.)


स्वातंत्र्यानंतर सत्तेचे राजकारण न करता सतत राबणाऱ्या शेतकरी समूहासाठी संघर्ष करणारे नागनाथ नायकवडी यांचे रूप आणखी तेजाळताना दिसते. आयुष्यातील उर्वरित सहा दशके त्यांनी शेतकऱ्यांच्या, धरणग्रस्तांच्या, दलित, आदिवासी, शेतमजूर, यांच्या हितासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी संघर्ष छेडला. शिक्षणाची दारे गरिबाला खुली झाली पाहिजेत म्हणून काम केले. शेवटच्या टप्प्यात त्यांनी सहकार चळवळ कशी चालविली पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर घालून दिला. वाळव्यात हुतात्मा किसन अहिर यांच्या नावाने साखर कारखाना स्थापन करून स्मारक उभे केले. नानकसिंग यांचे स्मारक सोनवडे येथे शैक्षणिक केंद्र स्थापन करून सुरू केले. लुधियानाहून येथे वारणेच्या खोऱ्यात लढताना जीव सोडणाऱ्या योद्ध्याचे तेवढेच स्मरण शिल्लक आहे. याचे श्रेय वाळव्याच्या शेतकऱ्यांना आणि नागनाथ नायकवडी यांना जाते.


साखर उद्योगास नवे वळण देणारा 'हुतात्मा पॅटर्न'चा प्रारंभ १९८१ मध्ये त्यांनी केला. लढाऊ स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख होतीच. सहकारी साखर कारखान्याच्या या नव्याने तयार झालेल्या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला. साखरेच्या उत्पादनाचा दर्जा, साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाची काटकसर, उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर, आदींचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून शेतकरी आणि साखर कामगारांना 'साखर साक्षर' केले. हुतात्मा साखर कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला साखर उताऱ्याचे महत्त्व पटवून दिले. उसाची लावण, भरणी, तोडणी, वाहतूक, गाळप ते कारखान्याचा काटकसरी व्यवहार याची उत्तम सांगड घातली. साखर कारखान्याच्या उभारणीसाठी काढलेल्या कर्जाचा एकही हप्ता एक दिवसही उशिरा भरला नाही. शेवटचा हप्ता भरून कारखाना कर्जमुक्त झाला तेव्हा सर्व शेतकरी सभासदांच्या घरात जिलेबीचे वाटप करून हा आनंद साजरा करणारा हुतात्मा हा एकमेव साखर कारखाना असेल. आज या कारखान्यात काम करणारा एकही कर्मचारी आता पस्तीस हजार रुपयांपेक्षा कमी वेतनावर नाही. साखर कामगारांना संघटित करून त्यांच्यासाठी वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करणारा एकमेव साखर उद्योगातील नेता नागनाथआण्णाच होते. उसाच्या गाळपाचे उत्तम नियोजन करून उत्पादकता वाढविण्याचे अनेक प्रयोग केले. परिणामी इतर कारखान्यांपेक्षा दोन-तीनशे रुपये प्रतिटन जादा भाव देता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले. सहकारात एक नवा आदर्श घालून दिला.


ज्या धरणांमुळे पाणी मिळाले, उसाचे मळे फुलले, त्या धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडून देता कामा नये, त्यांचे पुनर्वसन शंभर टक्के झाले पाहिजे, यासाठी लढणारा एकमेव साखर कारखाना त्यांनीच उभारला. आण्णांनी उपेक्षित, दलित यांच्याविरुद्ध लढताना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांपासून कधीही फारकत घेतली नाही. धर्मांध राजकारणाच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राॅबिनहूडसारखे होते. सतत फिरत राहणारे घरातून बाहेर पडलेले, स्वत:च्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पेन्शनवर गुजराण करणारे, अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे नागनाथआण्णा नायकवडी! साताराच्या प्रतिसरकारचा शासनाला विसर पडला तसाच विसर या क्रांतिकारकांचा पडू नये, यासाठी सतर्क राहिले पाहिजे, त्यांनी जी जीवनपद्धती स्वीकारली, सार्वजनिक जीवनात वावरताना जी मूल्ये जपली. त्यांचे आजन्म जतन करण्याचा निर्धार पुढील पिढ्यांनी केला पाहिजे. एक व्यक्तिमत्त्व म्हणून आण्णांकडे पाहिले तर अनेक आदर्श वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. १९७२ मध्ये घरदार सोडून शाळेत येऊन एखाद्या ऋषीमुनीसारखे राहण्यास सुरुवात केली. अखेरपर्यंत ते घरी गेले नाहीत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील वाळव्याला आल्या. आण्णांचा सत्कार केला. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना सांगितले की, ते शाळेतच राहतात. साखर कारखाना सुरू झाला की, साखर शाळेत राहतात. तेव्हा प्रतिभाताई पाटील यांनी आण्णांचा हात धरून कार्यक्रमाच्या ठिकाणाहून चालत घरी घेऊन गेल्या. राष्ट्रपतींनी आण्णांचा केलेला हा सन्मानच होता. पण तो प्रसंग सोडला तर आण्णा अखेरच्या श्वासापर्यंत शाळेतच राहिले! या थोर क्रांतिकारकास जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन!


भारत आणि महाराष्ट्र सरकारने प्रतिसरकारचे भव्य असे स्मारक करायला हवे. इतिहासाकडून काही शिकायचेच नसते का? साताराची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि प्रतिसरकारचे केंद्रस्थान आहे. साताऱ्याला भेटणाऱ्या माणसांना या इतिहासाची नोंद आपण एक आदर्श मूल्यांचा वस्तुपाठ म्हणून दाखवायला हवी. साताराच्या प्रतिसरकारचा इतिहास तर ताजा आहे. त्याचाही विसर समाज, शासन आणि प्रशासन तसेच नव्या पिढीला व्हावा, हे दुर्दैव आहे. प्रतिसरकारची लढाई उभी करणारी ही मुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची वंशावळ आहे, त्यांचा मला अभिमान वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफअली यांनी काढले होते. त्या लढ्यातील धगधगते क्रांतिकारक नागनाथ आण्णा होते!

Thanx वसंत भोसले संपादक लोकमत कोल्हापूर

काळकर्ते शिवराम परांजपे


* काळकर्ते शिवराम परांजपे *

********************************

शिवराम परांजपे यांचा

जन्मदिन  २७ जून १८६४ (महाड) तर

स्मृतीदिन  २७ सप्टेंबर १९२९ आहे .


पत्रकार, निबंधकार, लेखक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी झाला.


शिवराम परांजपे यांचे शिक्षण महाड, रत्‍नागिरी व पुणे या ठिकाणी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना संस्कृत भाषेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात संस्कृत शिकवले.


१८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. २५ मार्च रोजी याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'काळ'ने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र' अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. विष्णुशास्त्री चिपळूकर शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो.


‘काळ’ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवरामपंतांनी काही काळ लोकमान्य टिळक यांच्या समवेत सार्वजनिक कार्य केले. ते प्रभावी वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. १९०८ साली त्यांना ‘काळ’ मधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने अटक केली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९०९ पर्यंत ‘काळ’ चालू होता. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या जात-मुचलक्याची (जामिनाची) पूर्तता करणे शक्य न झाल्याने ‘काळ’ बंद पडला. 


पुढे १९२० साली परांजपे यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले. पुढे १९२२ मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले. विंध्याचल, संगीत कादंबरी, मराठ्यांच्या लढ्याच्या इतिहास, रामायणा विषयी काही विचार; अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. 


१९२९ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. परांजपे यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’ च्या बरोबरीने प्रेरक भूमिका बजावली, तसेच त्यांच्या लेखनाने पत्रकारिता व मराठी साहित्यातही मौल्यवान भर घातली.


‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञान शाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत. परांजपे हे कथालेखकही होते. 


आम्रवृक्ष, एक कारखाना, प्रभाकरपंतांचे विचार; या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. रत्‍नाकर मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत असे. वि.का. राजवाडे यांच्या भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचा सहभाग होता. 


शिवराम परांजपे यांचे २७ सप्टेंबर १९२९ रोजी निधन झाले...

पितामह दादाभाई नौरोजी



*पितामह दादाभाई नौरोजी 

दादाभाई नौरोजी यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी वर्सोवा,मुंबई येथे झाला.



भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस व्यापारी व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटन कडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले.


१८९२ ते १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.


दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते आणि अर्थशास्त्राचे जनक हिते. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.


मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.

स्मृती - ३० जून १९१७