स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाणाऱ्या आदरणीय
*नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म 19 मे 1913 रोजी इल्लूर, जि. अनंतपूर, आंध्रप्रदेश येथे झाला .
नीलम संजीव रेड्डी यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात 3 पंतप्रधानांना - मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह आणि इंदिरा गांधी यांना शपथ दिली. वेगवान राजकीय घडमोडींदरम्यान त्यांनी राष्ट्रपती म्हणून अशा परिस्थितीचा सामना केला ज्याबाबत घटनेमध्ये स्पष्ट तरतूद नव्हती. पूर्वीपासून चालत आलेला एखादा पायंडाही नव्हता की ज्याचे अनुकरण करावे. पण परिस्थिती मात्र लगेच निर्णय घेण्याची होती. आणि अशा वेळी त्यांनी नि:पक्षपाती भूमिका घेऊन आदर्श कायम केला. म्हणून भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
*शेतकरी कुटुंबात जन्म ते भारताचे राष्ट्रपती*
1 जून ही भारताचे सहावे राष्ट्रपती आणि आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या नीलम संजीव रेड्डी यांची पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील इल्लूर (जि. अनंतपूर) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नीलम चिनप्पा रेड्डी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. संजीव रेड्डींचे सुरुवातीचे शिक्षण अड्यार येथील थिऑसॉफिकल शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले.
*स्वातंत्र्यलढ्यात उडी*
शिकत असतानाच ते युवक काँग्रेसकडे आकर्षिले गेले. 1931 मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत उडी घेतली. यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. मधल्या काळात त्यांनी मिळेल ती नोकरी केली. तथापि, कुठेही ते कायम नोकरीत रमले नाहीत. नंतरच्या काळात ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले. तत्पूर्वी त्यांचा नागा रत्नम्मा यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना 2 मुले व 3 मुली अशी अपत्ये झाली. पैकी एक मुलगा बालपणीच अपघातात मृत्युमुखी पडला.
🔸महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सर्वस्व झोकून भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास झाला. 1946 मध्ये त्यांची तत्कालीन मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले.
🔮 *आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री*
त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांची निवड झाली. याबरोबरच त्यांची लोकप्रियता वाढली. ऑक्टोबर 1956च्या राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते बनले. यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसची 3 अधिवेशने झाली. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. १९६७ पर्यंत राज्यसभेचे ते सदस्य राहिले. जानेवारी १९६६ ते मार्च १९६७ दरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६७ मध्ये पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. निःपक्ष सभापती म्हणून ते लोकप्रिय झाले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडून जुनी व नवी काँग्रेस असे दोन गट झाले होते. इंदिरा गांधींचा पाठिंबा असलेले व्ही. व्ही. गिरी यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रयत्न केला. परंतु पदरी पराजय पडला. नंतर मात्र राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपले लक्ष अनंतपूर येथील शेती व्यवसायात वळवले.
*राजकारणात पुन्हा सक्रिय*
जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे आणीबाणीत ते पुन्हा सक्रिय राजकारणाकडे वळले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले (१९७७). पुन्हा त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली; परंतु काही दिवसांतच राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले.
🔹भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश करून त्यांनी काँग्रेस पक्षाचा सचिव ते भारताचे राष्ट्रपती अशी अनेक उच्चपदे भूषवली. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री वा अन्य मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीची पायाभरणी त्यांनी केली.
🔸कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
श्री. रेड्डी हे भारताचे एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात.
🙏🙏🙏
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق