*स्वातंत्र्यवीर केशवराव जेधे*
केशवराव जेधे यांचा जन्म - २१ एप्रिल १८९६ रोजी पुणे येथे झाला . तर त्यांचा स्मृतीदिन आहे १२ नोव्हेंबर १९५९ (पुणे)
केशवराव मारुतराव जेधे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, संपादक, खेडोपाडी कॉंग्रेस पोचविणारे आणि संयुक्ती महाराष्ट्र चळवळीचे नेते. त्यांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जायचे. जेधे कुटुंब महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या 'सत्यशोधक' समाजाचे पाठीराखे होते. १९२० च्या दशकात बहुजन समाजातील युवकांसाठी जेधे मॅन्शन एक राजकीय आणि सामाजिक शाळा म्हणून उदयास आली.
पुण्यात आल्यावर सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते थेट जेधे मॅन्शनकडे जात असत. गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावर जेधे मॅन्शन मधेच अनेक बैठका झाल्या होत्या. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि वर्ष १९२३ मध्ये त्यांच्या प्रचारार्थ 'शिवस्मारक' हे साप्ताहिक काढले. नंतर 'मजूर' हे वर्तमानपत्र काढून सत्यशोधक समाजाच्या विचारप्रणालीचा प्रचार केला. वर्ष १९२७ मध्ये 'कैवारी' या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणूनही निवडून गेले होते. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा त्यांच्या प्रयत्नातूनच उभा राहिला.
बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे १९३० नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळक नंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली. बहुजन समाजाचा पाठिंबा कॉंग्रेसला मिळाला आणि बॉम्बे प्रेसिडेंसीच्या विधानपरिषदेसाठी नोव्हेंबर १९३४ मध्ये पहिली निवडणूक जिंकली. १९३८ मध्ये ते प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दी मध्येच पुण्याचे कॉंग्रेस भवन उभे राहिले. मात्र पक्षाचा केंद्र बिंदू जेधे मॅन्शन भोवतीच होता.
महात्मा गांधीजींच्या पश्चात त्यांनी शेतकरी व कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ऑगस्ट १९५२ मध्ये ते पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतले. वर्ष १९४८ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने भाषिक राज्य देण्याचे वचन दिले होते, परंतु राज्य पुनर्गठन समितीने महाराष्ट्र गुजरातसाठी द्विभाषिक राज्याची शिफारस केली आणि मुंबई राजधानी म्हणून घोषित केली. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला आणि केशवराव जेधे यांच्या नेतृत्वात पुण्यात सर्वपक्षीय बैठक झाली आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ६ फेब्रुवारी १९५६ रोजी झाली.
दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्रात मुंबईतील १२ जागांसह १३३ पैकी १०१ जागा जिंकल्या, मात्र गुजरात, मराठवाडा विदर्भाच्या पाठिंब्याने कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकली. यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. मात्र जेधे, एस.एम. जोशी, एस.ए. डांगे, एन.जी. गोरे आणि पी.के. अत्रे यांनी संयुक्ता महाराष्ट्रासाठी चळवळ उभी केली. यात अनेकांचे बळीही गेले. तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनीही राजीनामा दिला. अखेर कॉंग्रेस हायकमांडने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला.
१९१५ ते १९५९ अशा चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात केशवराव जेधे यांनी जे कार्य केले, येथील समाजकारणाला आणि राजकारणाला दिशा दिली, ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचा जन्म एका सधन शेतकरी, मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्याची परंपरा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्या घराण्याचा मोलाचा सहभाग होता. तीच परंपरा विसाव्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी होऊन जेधे बंधूंनी पुढे चालवली. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला सक्रिय मदत करणारे जेधे बंधू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. पुण्यातील 'जेधे मॅन्शन' हे महाराष्ट्रातून आणि देशभरातून सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निवासस्थानच होते. म्हणूनच ते सामाजिक चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. रोज अनेक कार्यकर्त्यांना आदरातिथ्यासह जेवणही देण्यात येत असे. बंधू बाबूराव जेधे हेही अगदी प्रारंभापासून सत्यशोधक चळवळीमध्ये उदारपणे सर्व प्रकारचे साह्य करीत असत. कुटुंबाच्या उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा सामाजिक आणि राजकीय चळवळीला दिला जात असे. म्हणूनच जेधे कुटुंबीय या काळातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या; तसेच जनतेच्याही आदरास पात्र होते.
१९१८ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, १९२० च्या दरम्यान कॉलेज शिक्षणाचा त्याग करून केशवराव जेधे यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. केशवरावांना आपल्या घरीच आणि पुण्यात समाजकारणाचे आणि राजकारणाचे धडे मिळाले. छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुढील काळात महात्मा गांधी यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. छत्रपती शाहू महाराजांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव पडल्यामुळे महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची त्यांना ओळख झाली. १९१८ मध्ये महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे भरवलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत केशवराव स्वयंसेवक म्हणून हजर होते. १९१८ मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबई असेंब्लीत आंतरजातीय विवाह बिल मांडले, तेव्हा केशवराव जेधे यांनी पाठिंबा दिला. नंतर त्यांनी छत्रपती मेळा सुरू केला आणि येथूनच सत्यशोधक चळवळ गतिमान झाली. याच काळात महात्मा गांधींनी 'जेधे मॅन्शन'ला भेट दिली होती. मार्च १९२५ मध्ये केशवराव पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांनी नगरपालिकेच्या मालकीचे हौद आणि नळ अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा ठराव मांडला. हा ठराव १५ विरुद्ध १२ मतांनी नामंजूर झाला. पुण्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठरावही त्यांनी मांडला; पण दुर्देवाने नगरपालिकेत बहुजन समाजाचे सदस्य जास्त असूनही ठराव फेटाळला गेला. यावरून त्या काळात जुन्या रुढीवाद्यांचा किती मोठा पगडा होता, हे लक्षात येते.
सन १९२५ मध्ये 'देशाचे दुश्मन' हे दिनकरराव जवळकरांनी लिहिलेले पुस्तक वादग्रस्त ठरले. त्याचे प्रकाशक केशवराव जेधे होते. या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल कोर्टात खटला चालला व त्यात केशवराव जेधे यांना सहा महिने शिक्षा व शंभर रुपये दंड झाला. या खटल्यातील अपिलाचे वकिलाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवले आणि केशवरावांना २५ ऑक्टोबर १९२६ मध्ये कोर्टाने दोषमुक्त ठरवले. पुढे महाड सत्याग्रहात केशवराव सक्रिय सहभागी झाले. लोकमान्य टिळक यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांना केशवरावांच्या कार्याचे महत्त्व पटल्यामुळे दोघांत मैत्री झाली. जुलै १९२८ मध्ये जेधे बंधूंनी मुंबई इलाखा शेतकरी परिषद आयोजित केली होती. तुकडेबंदी विधेयकाविरुद्ध ही चळवळ होती. पुढे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संपर्कामुळे १९३० नंतर केशवराव जेधे महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीत सहभागी झाले. केशवराव जेधे यांचे कर्तृत्व आता पुण्यात आणि मुंबई इलाख्यातच न राहता, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात त्यांनी उडी घेतली आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील बहुजन समाज व खेड्यापाड्यातील कष्टाळू समाज मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये सहभागी झाला. गोलमेज परिषदेविरुद्ध ठराव मांडल्याने त्यांना अटक होऊन तीन महिने सक्तमजुरी व १००० रुपये दंड झाला होता. जानेवारी १९३२ च्या सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यात केशवरावांना अटक होऊन नशिकच्या कारागृहात सहा महिने तुरुंगवास व पन्नास रुपये दंड झाला होता.
सन १९३४ मध्ये कायदे मंडळाची निवडणूक लढवून केशवराव जेधे आणि काकासाहेब गाडगीळ विजयी झाले. डिसेंबर १९३६ ची फैजपूर काँग्रेस यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुण्यातील काँग्रेस यशस्वी करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. १९३७ च्या कौन्सिलच्या निवडणुकीत कॉँग्रेसला यशस्वी करण्यात जेधेंचाच वाटा होता. १९३७ मध्ये केशवराव जेधेंना महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष करावे म्हणून सेनापती बापट यांनी जाहीर मागणी केली आणि केशवराव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३५-३६ मध्ये काँग्रेसचे सभासद २८,२५८ होते, तर जेधेंच्या काळात ही सदस्यसंख्या १,६३,३८० (१९३७-३८) इतकी झाली. पुढे १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात ते सहभागी झाले. १९४४ नंतर स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी रचनात्मक कार्य हाती घेतले. मे १९४६ मध्ये केशवराव प्रांतिक काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष झाले. शंकरराव देवांचा त्या वेळेस पराभव झाला. १९४६ मध्ये जेधे घटना समितीचे सभासद झाले. १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये वरिष्ठ वर्ग व भांडवलदारांचे वाढते वर्चस्व केशवरावांना आवडले नाही. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि शंकरराव देव यांचा गट हा शेतकऱ्यांच्या हितसंबंधाला विरोध करू लागला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदानही मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि शंकरराव देव यांनी बंद केले. काँग्रेसअंतर्गत शेतकरी आणि कामगारांची एक भक्कम फळी निर्माण करावी म्हणून शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव यांचे त्यांनी सहकार्य घेतले; पण बाळासाहेब खेर सरकारने शेतकरी संघाला विरोध केला. म्हणून १३ मे १९४८ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी गतिमानता निर्माण केली. चार-पाच वर्षे या पक्षासाठी त्यांनी काम केले; पण नि:स्वार्थी स्वभावाच्या या नेत्याचे पक्षातील नेत्यांशी, प्रामुख्याने शंकरराव मोरे यांच्याशी मतभेद झाल्याने २४ एप्रिल १९५४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा त्यांनी त्याग केला आणि पुन्हा १५ ऑगस्ट १९५४ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या मूळ प्रवाहामध्ये ते सामील झाले. सत्ता स्पर्धेपेक्षा रचनात्मक आणि सामाजिक कार्य करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन या लढ्यांत त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. गोवा मुक्ती समितीचे ते अध्यक्ष होते. ना. ग. गोरे व जयंतराव टिळक हे सेक्रेटरी होते. फेब्रुवारी १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. त्यात केशवराव जेधे कायमचे निमंत्रित होते.
केशवराव जेधे यांचे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा